Advertisement

रिक्षा-टॅक्सीपाठोपाठ अाता एसटीलाही हवीय भाडेवाढ

इंधन अर्थात डिझेल, गाड्यांचे सुट्टे पार्ट - टायरच्या किंमती आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता-वेतन या तीन घटकांवर एसटीची भाडेवाढ अवलंबून असते. या घटकांच्या दरात वाढ झाल्यास एसटीच्या भाड्यात वाढ करता येते.

रिक्षा-टॅक्सीपाठोपाठ अाता एसटीलाही हवीय भाडेवाढ
SHARES

इंधन दरवाढीचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसायला सुरूवात झाली आहे. सीएनजीचे दर वाढल्यानं रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी उचलून धरली जात आहे. यात भर म्हणून आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी) नेही भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. डिझेल दरवाढ आणि इतर कारणांमुळे एसटीवरील आर्थिक भुर्दंड वाढला आहे, असं म्हणत एसटीनं भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे.


संचालक मंडळाची मंजुरी

भाडेवाढीच्या प्रस्तावाला एसटीच्या संचालक मंडळानं मंजुरी दिली असून आता राज्य सरकारच्या परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीची प्रतिक्षा असल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. ही मंजुरी मिळाल्यास एसटीचा प्रवास महागणार आहे.


डिझेल महागलं

इंधन अर्थात डिझेल, गाड्यांचे सुट्टे पार्ट - टायरच्या किंमती आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता-वेतन या तीन घटकांवर एसटीची भाडेवाढ अवलंबून असते. या घटकांच्या दरात वाढ झाल्यास एसटीच्या भाड्यात वाढ करता येते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या किंमती वाढत असून डिझेलच्या किंमती सध्या प्रति लिटर ८० रुपयांच्या घरात गेल्या अाहेत. त्यामुळे डिझेल खरेदीवरील एसटीचा आर्थिक भार वाढला आहे.


व्यवस्थापकीय खर्च वाढला 

दुसरीकडे नुकतीच एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यानंही एसटीच्या तिजोरीवर भार पडला आहे. गाड्यांचे सुट्टे पार्ट-टायरच्या किंमतीही सातत्यानं वाढत आहेत. एकूणच एसटी गाड्यांच्या देखभाल-दुरूस्तीसह व्यवस्थापकीय खर्च वाढला अाहे. त्यामुळे एसटीवरील कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भार वाढला आहे.


८ ते ९ टक्के वाढ

या पार्श्वभूमीवर एसटीनं भाडे वाढीचा प्रस्ताव आणला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ते ९ टक्क्यांची भाडेवाढ प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला एसटीच्या संचालक मंडळाची मंजुरी मिळाली असून आता केवळ राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. त्यानुसार हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचं एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितलं अाहे. 



हेही वाचा - 

सीएनजीच्या दरात वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडे वाढवण्याची मागणी

ठाणे-मुंब्रा बायपास रोड वाहतुकीसाठी खुला, पण दुरुस्तीचं काम अपूर्णच





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा