Advertisement

प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वे स्थानकांत सुविधांचे नकाशे


प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वे स्थानकांत सुविधांचे नकाशे
SHARES

नवख्या मंडळींना सेवा-सुविधांची माहिती व्हावी यासाठी रेल्वे स्थानकांमध्ये डिजिटल नकाशे बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. देश-विदेशांतून येणारे पर्यटक आणि रोजगाराच्या शोधात मुंबईची वाट धरणाऱ्या बेरोजगारांना रेल्वे स्थानकात आल्यानंतर सेवा-सुविधांच्या माहितीअभावी वणवण करावी लागते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांमध्ये असे फलक बसविण्यात आले असून आता आणखी १७ स्थानकांत नकाशे बसवण्याचं काम हाती घेतलं आहे. मुंबईच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. त्याचबरोबर रोजगाराच्या शोधात परराज्यांतून मोठ्या संख्येनं तरुण येत असतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, वांद्रे टर्मिनस, कुर्ला टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल इत्यादी रेल्वे स्थानकांवर उतरल्यानंतर अनेकांना आवश्यक सुविधा कुठे उपलब्ध होतील याची माहिती नसते. तसेच पर्यटकांना रेल्वे प्रवास करताना माहितीअभावी सुविधांचा लाभ घेणे अवघड ठरते.

मुंबईत येणाऱ्या नवख्या प्रवाशांना स्थानकातील प्रवेशद्वार, प्रतीक्षालय, प्रसाधनगृहे, खाद्यपदार्थ स्टॉल, तिकीट खिडक्या इत्यादी सुविधांची माहिती नसते. त्यामुळे त्यांना स्थानकातील प्रवासी, सुरक्षा दल किंवा स्टेशन मास्तरांकडे विचारणा करावी लागते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी विविध सुविधांची माहिती देणारे डिजिटल नकाशे स्थानकात बसवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात ५ डिजिटल नकाशे बसवण्यात आले असूून यातील एक नकाशा पालिकेच्या दिशेनं जाणाऱ्या सब-वे जवळच आहे. याशिवाय दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, मशीद रोड, सॅन्डहर्स्ट रोड स्थानक, भायखळा, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली, मानखुर्द स्थानकांतही नकाशे बसवण्याचे काम सुरू आहे. एका आठवड्यात ती कामं पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य स्थानकांतही ते बसवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा