रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक


SHARE

रेल्वे मार्गावरील रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी असूनही चाकरमान्यांचे मेगाहाल होणार आहेत.

मध्य रेल्वे -
ठाणे ते कल्याण स्थानका दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर स.11.20 ते दु 4.20 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. सकाळी 10.48 ते दुपारी 4.23 वाजेपर्यत मुलुंडहून सुटणारी डाऊन धिम्या मार्गावरील सेवा मुलूंड ते कल्याण स्थानका दरम्यान डाऊन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. सीएसटीहून सकाळी 10.20 ते दुपारी 2.54 या वेळेत डाऊन जलद मार्गावरून सुटणाऱ्या सर्व लोकल गाड्यांना आपल्या नियमित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी,भांडुप आणि मुलूंड या स्थानकावर थांबा देण्यात येणार असून, 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच अप जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी 11 ते दुपारी 3.08 या वेळेत मुलूंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे त्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर लाईन -
हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दु. 4.10 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लाॅक दरम्यान हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत बंद असणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी रविवारी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर मार्गाने प्रवास करू शकतात.

पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लाॅक -
पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकादरम्यान जम्बोब्लाक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या