Advertisement

मेट्रोच्या 'या' मार्गावर धावणारी रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत होणार दाखल


मेट्रोच्या 'या' मार्गावर धावणारी रेल्वेगाडी २७ जानेवारीला मुंबईत होणार दाखल
SHARES

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या २ मार्गिकांवर प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या मार्गिकांवर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेपैकी पहिली गाडी २७ किंवा २८ जानेवारीला मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही गाडी मुंबईत दाखल झाल्यानंतर २९ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तिचे अनावरण केले जाण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मुंबई आणि परिसरात २०२६ पर्यंत ३३७ किमीचे मेट्रोचं जाळं उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो २ ए (डीएन नगर ते दहिसर) आणि मेट्रो ७ (अंधेरी पू. ते दहिसर पू.) या एकूण ३५ किमीच्या २ मार्गिका यावर्षी कार्यरत करण्याचं उद्दिष्ट आहे.

मेट्रो गाड्यांची बांधणी बंगळूरु स्थित भारत अर्थ मूव्हर्स लि. (बीईएमएल) इथं सुरू आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘बीईएमएल’च्या कारखान्यात पहिल्या मेट्रो रेल्वेगाडीचे शुक्रवारी अनावरण केले. पुढील आठवड्यात ही गाडी बंगळूरु येथून निघून २७ किंवा २८ जानेवारीपर्यंत चारकोप येथील डेपोमध्ये दाखल होईल.

या गाडीची मार्चमध्ये चाचणी घेण्यात येणार असून, जूनमध्ये दोन्ही मार्गिका कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद करण्यात आलं आहे. फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्यात २ रेल्वेगाड्या येणार आहेत. दोन्ही मार्गिकांवर मिळून सुरुवातीस १० गाड्या धावणार असल्याची माहिती मिळते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा