Advertisement

ठाकूरबाई आल्या पण रेल्वेतून प्रवास न करताच गेल्या


SHARES

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या महिला विशेष गाडीला गुरुवारी 25 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्ताने गुरुवारी चर्चगेट स्टेशनवर महिला विशेष ट्रेनचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी राज्याच्या महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर देखील उपस्थित होत्या. विद्या ठाकूर या महिला विशेष गाडीतून प्रवास करणार होत्या मात्र त्यांना कदाचित त्याचा विसर पडला असावा कारण त्या आल्या पण प्रवास न करताच निघून गेल्या. ट्रेनमधून प्रवास न करता, महिला डब्ब्यातील महिलांच्या समस्या न जाणून घेताच विद्या ठाकूर महिलांना भेटून निघून गेल्याचे पहायला मिळालं. राम मंदिर स्टेशनच्या उद्घाटनाच्या वेळी विद्या ठाकूर यांचं श्रेयवादाचं रुप आपण सगळ्यांनीच पाहिलं होतं. मात्र आज त्यांना महिला डब्ब्यातून प्रवास करून महिलांच्या समस्या जाणून घ्यायला देखील वेळ नव्हता.

जगातील पहिली महिला विशेष गाडी 5 मे 1992 ला चर्चगेट ते बोरीवली रेल्वे स्थानकांदरम्यान चालवण्यात आली होती. त्यानंतर या महिला विशेष ट्रेनचा प्रवास सुरू झाला. अजुनही तत्परतेने ही गाडी महिला प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज आहे. प्रवासादरम्यान महिलांच्या संख्येत वाढ झाल्याने महिलांसाठी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. सद्यस्थितीत मुंबईत दिवसाला महिलांसाठी 8 विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. सकाळी आणि संध्याकाळी ही ट्रेन चालवली जाते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पश्चिम रेल्वेने 60 महिला डब्ब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावले आहेत. महिलांची वाढती संख्या पाहता आणखी ट्रेन्स चालवण्यात येतील असं विद्या ठाकूर यांनी यावेळी आश्वासन दिलं.

महिलांसाठी विशेष गाडी सुरू करण्यासाठी आमच्या संघटनेनेच खुप प्रयत्न केले होते. मात्र हा ऐतिहासिक क्षण साजरा करताना रेल्वे प्रशासनाने आम्हाला डावलून राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना महत्व दिले. याचा निषेध म्हणून आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. मुळात गेल्या 25 वर्षात महिला प्रवाशांना काय मिळालं, याचा अभ्यास व्हावा. अवघ्या दोन-तीन महिला स्पेशल मिळाल्या पण महिलांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे दोन-तीन लोकल म्हणजे महिलांची थट्टाच नाही का? अनेक महिला गर्दी नको म्हणून जॉब सोडण्याच्या मानसिकतेत आहेत. ही शोकांतिका आहे पण केवळ पोटासाठी त्या प्रवास करतात. केवळ पत्रे पाठवणं, निवेदन देणं म्हणजे प्रयत्न होत नाहीत.

- वंदना गायकवाड, अध्यक्ष महिला प्रवासी संघटना    

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा