Advertisement

22 लाख पगाराचा 'ट्री सर्जन' गेला कुणीकडे?


22 लाख पगाराचा 'ट्री सर्जन' गेला कुणीकडे?
SHARES

मेट्रो-3 प्रकल्पातील झाडे कापण्याचे आणि झाडांच्या पुनर्रोपनाचे काम शास्त्रोक्त पद्धतीने, झाडे मरू न देता केले जाईल, असे एक ना अनेक दावे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने केले आहेत. या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ट्री सर्जनची नियुक्ती करण्यात आली असून, या ट्री सर्जनला महिना 21 लाख 94 हजार रुपये इतका पगारही देण्यात आला आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून झाडांची कत्तल आणि पुनर्रोपनाचे काम सुरू असताना हा 22 लाख रुपये पगार घेणारा 'ट्री सर्जन' काही दिसलेला नाही. ज्या झाडांचे पुनर्रोपन करायचे आहे ती झाडे कशाही पद्धतीने कापली जात असल्याने झाडे मरत आहेत. आणि त्यातही धक्कादायक बाब म्हणजे हीच मेलेली झाडे आरेत पुनर्रोपित करण्याचा प्रताप एमएमआरसीकडून चालू आहे. एमएमआरसीच्या या मनमनी कारभाराबाबत पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त तर होत आहेच, पण त्याचवेळी हा 22 लाख रुपये पगार घेणारा ट्री सर्जन गेला कुणीकडे? असा प्रश्नही त्यांना पडला आहे.

सिमाँऩ लिआँग या सिंगापुरमधील ट्री सर्जनची नियुक्ती एमएमआरसीकडून झाडे कापण्यासाठी तसेच झाडांच्या पुनर्रोपनाच्या कामासाठी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या ट्री सर्जनचा अजूनही पत्ताच नसल्याने या ट्री सर्जनच्या देखरेखीत शास्त्रोक्त पद्धतीने काम सुरू असल्याचा एमएमआरसीचा दावा साफ खोटा असल्याचा आरोप सेव्ह ट्रीने केला आहे. दक्षिण मुंबईत गेल्या पंधरा दिवसांपासून झाडे कापण्याचे काम सुरू आहे. 

ज्या झाडांचे पुनर्रोपन करायचे आहे ती झाडे विशिष्ट पद्धतीने ट्री सर्जनच्या देखरेखीत, मार्गदर्शनाखाली कापली जायला हवीत. प्रत्यक्षात मात्र कंत्राटदार कशाही पद्धतीने झाडे कापत असल्याने पुनर्रोपित करण्यात येणारी 50 झाडे मेली आहे. तर ही मेलेली झाडे आरेत लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती सेव्ह ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी दिली आहे. झाडांचा घेर 12 इंच हवा असताना हा घेर 7 इंचाचा ठेवण्यात आला आहे. तर 100 चौ. मीटरच्या क्षेत्रात पाच झाडे लावली जायला हवीत तिथे चक्क 16 झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे जिवंत पुनर्रोपित झाडे जगतीलच कशी? असा सवालही बाथेना यांनी केला आहे.

ट्री सर्जनची नियुक्ती केल्याचे सांगणाऱ्या एमएमआरसीने हा ट्री सर्जन कुठे आहे? याचे उत्तर द्यावे, अशी मागणी सेव्ह ट्रीने केली आहे. तर याबाबत उच्च न्यायालयाच्या उपसमितीकडे तक्रारही दाखल केली आहे. उच्च न्यायालयाची मुख्य समिती अद्याप स्थापन व्हायची असून, या समितीच्या निर्दशनासही ही बाब आणून देण्यात येणार असल्याचेही बाथेना यांनी स्पष्ट केले आहे. तर हा झाडांच्या कत्तलीचा तसेच पुनर्रोपनाचा मोठा घोटाळा असल्याचा आरोप आता पर्यावरण प्रेमींकडून यानिमित्ताने केला जात आहे.

एमएमआरसीची आळीमिळी गुपचिळी

22 लाख पगाराचा गेला ट्री सर्जन कुणीकडे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रवक्त्यांशी 'मुंबई लाइव्ह'ने संपर्क साधला असता काम वृक्ष प्राधिकरणाच्या आणि एमएमआरसी अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सुरू असल्याचे प्रवक्त्याने सांगितले आहे. पण ट्री सर्जन कुठे आहे? याचे उत्तर काही दिले नाही. त्यामुळे एमएमआरसीच्या या चुप्पीमागे नक्की काय दडलय? असा प्रश्नही सेव्ह ट्रीकडून आता विचारला जात आहे.

संबंधित विषय