Advertisement

मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क

कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवण्यात आलं आहे.

मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क
SHARES

कांजूरमार्ग इथं सुरू असलेलं मेट्रो कारशेडचं काम ताबडतोब थांबवा. कारण या जागेवरील हक्क आम्ही अजून सोडलेला नाही. त्यामुळे कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय तात्काळ रद्द करा, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवण्यात आलं आहे. या पत्रामुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र विरूद्ध राज्य सरकार असा वाद पुन्हा विकोपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ठाकरे सरकारने पर्यावरणाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला होता. यावरून भाजप नेत्यांकडून सरकारवर बरीच टीका करण्यात आली. परंतु या टीकेला न जुमानता ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देऊन तिथं मेट्रो ३ आणि मेट्रो ६ अशा दोन्ही मार्गांसाठी कारशेड उभारण्याला परवानगी देण्यात आली. 

हेही वाचा - मेट्रो कारशेड हलवल्यामुळे ‘इतका’ खर्च वाया?

कांजूरमार्गमधील १०२ एकर जागेवर मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू झालेलं असताना केंद्र सरकारच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) या जागेवर आपला हक्क सांगितला आहे. ‘डीपीआयआयटी’ने राज्य सरकारला पत्र पाठवून बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘डीपीआयआयटी’ने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा मिठागराची आहे. या जागेवरील हक्क आम्ही अजून सोडलेला नाही. याआधीही आम्ही  एमएमआरडीएचा प्रस्ताव फेटाळला होता. कांजूरमार्गची जागा एमएमआरडीएला देण्याचा निर्णय रद्द करा. परस्पर कारशेडचं काम सुरु करणं चुकीचं आहे. जिल्हाधिकारी, एमएसडी आणि एमएमआरडीए यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे डीपीआयआयटीचं मोठं नुकसान झालं आहे. कारशेडचं काम थांबवून केंद्र सरकारच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात दिलेले आदेश रद्द करावेत, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.  (modi government sends notice to maharashtra government and ask to stop metro car shed work at kanjurmarg by mmrda)

यावर राज्य सरकारने देखील आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं मेट्रो कारशेडचं काम थांबणार नाही. कारण ही जागा केंद्राची नाही, तर राज्य सरकारची आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई मिररला दिली आहे. 

राज्य सरकारने देखील सर्व कागदपत्रांची पूर्तता करत केंद्राचा दावा खोडून काढण्याची तयारी केली आहे. केंद्र सरकारकडून या जागेवर आक्षेप घेण्यात येणार हे ठाऊक असल्याने त्यासाठी आधीच तयार करून ठेवण्यात आली होती. याकडे पाहता कांजूरमार्गच्या जागेवर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये खडाजंगी होण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा - आदित्य ठाकरेंनी केली मेट्रो कारशेडच्या नव्या जागेची पाहणी, म्हणाले...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा