• एसटीची शिवा'ई'-बस
 • एसटीची शिवा'ई'-बस
 • एसटीची शिवा'ई'-बस
 • एसटीची शिवा'ई'-बस
SHARE

जगभरात इलेक्ट्रिक गाड्यांची आणि त्या वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या गाड्या पर्यावरणपूरक व विजेवर चालणाऱ्या असल्यामुळं त्यांना जगभरात पसंती मिळत असून, भारतातही या गाड्यांना चांगली पसंती मिळत आहे. याचं कारण म्हणजे देशातील 'प्रदूषण’. या प्रदूषणाचा विचार करत आणि भविष्यकाळ लक्षात घेत भारतातील अनेक जण इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. अशातचं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (एसटी) प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी इलेक्ट्रिक बस गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पहिल्या टप्प्यात भारत सरकारनं जाहीर केलेल्या फेम-२ योजने अंतर्गत भाडेतत्वावरील १५० वातानुकूलित बस घेणार आहे. एका बसची किंमत सुमारे २ कोटी रुपये एवढी आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक बस प्रामुख्यानं मुंबई, पुणे, नाशिक या शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर सुरू करण्याचा महामंडळाचा विचार आहे. सध्या पर्यावरणाच्यादृष्टीनं राज्यात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिलं जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडून ई-बसला पसंती दिली जात आहे. याच पार्श्वभुमीवर एसटीकडूनही ई-बस घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

गुरुवार ५ सप्टेंबर रोजी पहिली इलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात झाली. 'शिवाई' असं या बसचं नाव आहे. ताफ्यात दाखल झाल्यानंतर या बसचं लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. ही बस दादर ते पुणे दरम्यान धावणार आहे. मात्र, या बसच्या तिकीट भाड्याची माहिती महामंडळाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळं या बसचं तिकीट भाडं किती असणार? आणि भविष्यात या बसला प्रतिसाद मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ही इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी ३०० किलो मीटरचा पल्ला गाठणार आहे. या इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे. शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. तो महाराष्ट्रानं सुरु केला आहे.

इलेक्ट्रिक बसची वैशिष्ट्यं

 • 'शिवाई' बसची लांबी १२ मीटर असून रुंदी २.६ मीटर तर उंची ३.६ मीटर इतकी आहे.
 • इलेक्ट्रिक बस चालविण्यासाठी ३२२ किलो वॅट क्षमतेची लिथिअम आयर्न फॉस्फेटची बॅटरी वापरण्यात आलेली आहे.
 • या इलेक्ट्रिक बसची आसन क्षमता ही ४३+१ इतकी असून, त्यांना पुशबॅक स्वरूपाची आरामदायी आसने लावण्यात आली आहेत.
 • इलेक्ट्रिक बस ही वातानुकूलित असून, त्यास ३६ किलो वॅट क्षमतेची वातानुकूलित यंत्रणा लावण्यात आलेली आहे.
 • इलेक्ट्रिक बस एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी ३०० किमीचा पल्ला गाठणार आहे.
 • या बसच्या चार्जिंगसाठी किमान १ ते ५ तास (१ तास जलद चार्जिंग व ३ ते ५ तासाचं सर्वसाधारण चार्जिंग) इतका वेळ लागणार आहे.
 • इलेक्ट्रिक बस ही १ किलो वॅटमध्ये किमान १ ते १.२५ किमी चालण्याची अपेक्षा आहे.
 • इलेक्ट्रिक वाहन चालविण्याचा खर्च हा महामंडळातील शिवशाही वाहनांच्या चालन खर्चापेक्षा जास्त असून शिवनेरी वाहनांच्या चालन खर्चापेक्षा कमी आहे.
 • इलेक्ट्रिक बसच्या वापरामुळं प्रदूषणात फार मोठ्या प्रमाणावर घट होणार असून, डिझेल सारख्या इंधनाचा वापर बंद होणार आहे.
 • इलेकट्रीक बस बॅटरी व मोटर यांच्या साहाय्यानं चालणार होणार असल्यानं इंजिन, गिअर बॉक्स, ट्रान्समिशन इत्यादी बाबींच्या सामान खर्च तसंच, देखभालीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही.
 • इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी दिवसा ६ रुपये प्रति युनिट व रात्री ४.५ रुपये प्रति युनिट या सवलतीच्या दरात विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे.

इलेकट्रीक बसच्या खरेदीसाठी भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या फेम-२ योजने अंतर्गत प्रति बस ५५ लाख रुपयांपर्यंत अनुदान प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सध्या एकूण ५० वाहनांसाठी अनुदान देण्याचं भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयानं जाहीर केलं आहे. उर्वरित १०० वाहनांसाठी देखील अनुदान मिळविण्याचं महामंडळातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेल्या धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहनांना पथकरातून आणि वाहनांच्या रजिस्ट्रेशन फीमधून सवलत मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) सेवा 'गाव तेथे एसटी’, 'रस्ता तेथे एसटी' या ब्रीदवाक्यानुरूप खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. एसटी महामंडळाकडून महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून विभागीय कामकाज चालवलं जातं. एसटीच्या ताफ्यात १८ हजार ५०० बस आहेत. तसंच१२३ शिवनेरी बस असून१००० शिवशाही बस आहेतया सर्व बस डिझेलवर चालणाऱ्या आहेत. मागील दीड-दोन वर्षामध्ये डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्यानं एसटीला आर्थिक भार सहन करावा लागला आहे. ही दरवाढ सध्या स्थिर असली तरी डिझेलचा खर्च वाढत चालल्यानं एसटीकडून इतर पर्यायांचा विचार सुरू करण्यात आला आहे

नुकतंच बेस्टची इलेक्ट्रिक बस दाखल झाली. सोमवारपासून ही बस मुंबईतील रस्त्यांवर धावू लागली आहे. बेस्टची ही इलेक्ट्रिक बस प्रतिक्षानगर ते सायन या मार्गावर चालवली जात असून, ३०२ हा या बसचा क्रमांक आहे. बेस्टच्या ताफ्यात ६ वातानुकूलित आणि ४ विना वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बेस्ट उपक्रम इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करणार आहे. या बसचं चार्जिंग स्टेशन धारावी आगारात असणार आहे. एकदा चार्ज केल्यावर ही बस दिवसभर चालणार आहे.

देशात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिलं जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक बसला पसंती देण्यात आली आहे. बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणण्याचं याआधीच जाहीर केले आहे. डिझेलचे वाढते दर आणि होणारे प्रदूषण टाळण्यासाठी येणारा काळ हा इलेक्ट्रिक बसचा असणार आहे.हेही वाचा -

बेस्टची इलेक्ट्रिक बस धावणार मुंबईच्या रस्त्यावर

एसटीच्या ताफ्यात आली पहिली इलेक्ट्रीक बससंबंधित विषय
ताज्या बातम्या