Advertisement

आता 'शिवशाही'त वाजणार 'शहनाई' !


आता 'शिवशाही'त वाजणार 'शहनाई' !
SHARES

लग्नाचा सीझन नुकताच सुरू झाला आहे. लांबच्या ठिकाणी लग्न समारंभ म्हटलं की वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी वाहनाची शोधाशोध सुरू होते आणि हे वाहन वेळेत न मिळाल्यास मोठी पंचाईतही होते. त्यातच सर्व वऱ्हाडींचा प्रवास आरामदायी होईल की नाही? अशी चिंता वधु किंवा वरपक्षाला भेडसावत असते. पण आता चिंता नको. कारण एसटीची अत्याधुनिक सुविधांनी सज्ज 'शिवशाही' बस लग्न सराईच्या सीझनमध्ये तुमच्या मदतीला धावून येणार आहे. एवढंच नव्हे, तर ही बस साखरपुडा, बारसे अशा अनेक आनंददायी सोहळ्यांमध्ये सामील होऊन सुखद प्रवासाचा आनंदही देऊ करणार आहे.  


प्रासंगिक करारावर बस

'शिवशाही' ही राज्य परिवहन बस सर्वसामान्यांना रु. ५४ प्रती किमी इतक्या माफक दरात प्रासंगिक करारावर देण्यात येईल. त्याबाबतचं परिपत्रक नुकतंच एसटी प्रशासनाने सर्व आगारांना पाठवलं आहे, अशी माहिती परिवहन आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.


कमी दरात आरामदायी प्रवास

पूर्वी वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारी 'एसटी' हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जात होतं. पण कालांतरानं लग्नाचं 'बजेट' जसं वाढले तसं वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी चांगल्या आरामदायी बसची मागणी वाढू लागली, त्यामुळे एसटीच्या बसकडे अनेक वऱ्हाडी मंडळींनी पाठ फिरवली.

पण, शिवशाही बसचं आगमन होताच अनेकांनी या बस लग्नसराईसाठी प्रासंगिक करारावर देण्याबाबत महामंडळाकडे विचारणा सुरू केली. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने ८ डिसेंबरपासून शिवशाही ही ४५ आसनी बस ५४ रु प्रति कि. मी. दराने प्रासंगिक करारावर देण्याचं ठरवलं आहे.


दिवसाला ३५० किमीचं भाडे

याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून, दिवसाला किमान ३५० किमीचं भाडे भरून प्रचलित प्रासंगिक करार पद्धतीनुसार ही बस भाड्याने घेता येईल. याच बरोबर धार्मिक यात्रा, सहल आणि इतर कारणांसाठी समूहाने जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस प्रासंगिक करारावर उपलब्ध होणार आहे. याचबरोबर सध्या ज्या आगाराकडे या बसेस उपलब्ध आहेत, त्या आगारात याबाबत अधिक चौकशी करून नोंदणी करता येईल, असं एसटी प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे.

संबंधित विषय