Advertisement

एसटीच्या कर्मचाऱ्यांचं निलंबन; तर 'इतके' कामावर रुजू

विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळानं निलंबनाची कारवाई सुरू ठेवली आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांचं निलंबन; तर 'इतके' कामावर रुजू
SHARES

विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळानं निलंबनाची कारवाई सुरू ठेवली आहे. मागील २ दिवसांत आणखी १२५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार १७८ झाली असून ११ नोव्हेंबपर्यंत एकूण २ हजार ५३ कर्मचारी निलंबित झाले होते. कारवाईच्या धास्तीने कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली असून त्यामुळे स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील एसटी चालवण्याचे प्रमाण रविवारी वाढल्याचं समजतं.

राज्यात १०४ गाड्या धावल्याची माहिती महामंडळानं दिली. धावत असलेल्या गाड्यांमध्ये रविवारी ६० पैकी ५० मार्गावर शिवशाही, शिवनेरी गाड्याच चालवण्यात आल्या. विलीनीकरणाच्या मागणीवर काही कर्मचारी ठाम असून संप सुरूच ठेवला आहे.

रविवारीही कर्मचारी परतणाऱ्यांची संख्या वाढली. शनिवारी ३ हजार १६६ कर्मचारी कामावर रुजू झाले असतानाच रविवारी हीच संख्या ३ हजार ९८७ पर्यंत पोहोचली. यात चालक १९५ आणि ७७ वाहक आहेत. शनिवारी १११ चालक आणि ३२ वाहक कर्तव्यावर रुजू झाले होते. त्यामुळे स्वमालकीच्या आणि खासगी शिवशाही, शिवनेरीबरोबरच साध्या बसही चालवण्याची संख्या काहीशी वाढली.

मागण्यांसाठी एसटीतील १७ लहान-मोठ्या कामगार संघटनांनी एक कृती समिती स्थापन केली असून, या समितीत मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना, शिवसेनेची महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) यासह अन्य संघटनांचा समावेश आहे.

मंत्रालयाजवळ आत्मदहन करण्याचा प्रयत्न

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर एका राजकीय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळ आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलं. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांही सहभागी झाल्या होत्या. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी जनशक्ती संघटनेशी संलग्न असल्याचा दावा केला.

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण झालेच पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. अशा आशयाची घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा