Advertisement

लोकल सुरू करण्यासाठी व्हॉट्सअॅपद्वारे आंदोलन


लोकल सुरू करण्यासाठी व्हॉट्सअॅपद्वारे आंदोलन
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवा बंद करण्यात आली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच तसंच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वेळेत निश्चितस्थळी पोहोचण्यासाठी लोकल सुरू करण्यात आली. मार्च महिन्यात बंद केलेली लोकल सेवा जूनपासून सुरू करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह आधी सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांना लोकल सेवेचा लाभ मिळत आहे. मात्र अद्याप सर्वसामान्य प्रवासी हे लोकल प्रवासापासून वंचित आहेत. जवळपास अनेकजण आता लोकलप्रवास करत आहेत, मात्र केवळ सर्वसामान्य प्रवाशाला रेल्वे प्रवासाची परवानगी नसल्यामुळं वारंवार आंदोलन करण्यात येत आहेत. अशातच आता व्हॉट्सअॅपद्वारे लोकल सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

सर्वांसाठी लोकल सुरू होत नसल्यानं, आधी निषेध मग आंदोलन करण्याचा निर्णय प्रवासी संघटनेने घेतला आहे. 'सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबई लोकल ट्रेन सुरू करा', असा मजकूर लिहिलेला फोटो आपल्या व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून हजारो प्रवासी सरकारचा आगळ्या पद्धतीने निषेध करणार आहेत.

लोकल ट्रेन नसल्यामुळे एमएमआरमधील शेतकरी आणि दूधविक्रेत्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागत आहे. प्रवाशांना लोकलचा पर्याय नसल्यानं रस्त्यांवर वाहतूककोंडी वाढत असल्यानं प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढेल, यासाठी सरकारने सामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिलेली नाही. दरम्यान बाजारात, तसेच एसटी-बेस्टमध्ये गर्दी मात्र वाढत आहे.

सर्वसामान्यांच्या लोकलप्रवासावर बंदी लादण्यात आल्याने सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होत आहे. कसारा-आसनगाव-टिटवाळा तसेच कर्जत-बदलापूर-अंबरनाथ येथील शेतकरी-दूधविक्रेत्यांना तबेल्यातील दूध शहरी भागात पोहचवण्यासाठी रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो. ४० लिटरचे ५-६ कॅन दुचाकीला लावून अनेकजण पहाटेच शहरात येतात. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकी नादुरुस्त होत आहेत, अपघात होत आहेत.

दरम्यान, ८ दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरू झाली नाही, तर प्रवाशांच्या संतापाला राज्य सरकार जबाबदार असेल. लोकल प्रवासासाठी सामान्यांनी आंदोलन किंवा रेल रोको केल्यानंतरच सरकार परवानगी देणार का? असा प्रश्न प्रवासी महासंघाने उपस्थित केला आहे.

'सर्वांसाठी मुंबई लोकल ट्रेन सुरू करा', असा मजकूर लिहिलेला फोटो आपल्या व्हॉट्सअॅप डीपीवर ठेवून सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीच प्रवासी महासंघाने आंदोलनाची घोषणा केली आहे. त्याला प्रवासी संघटनेचा पाठिंबा आहे, असे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा