Advertisement

रेस्टाॅरंट्सची वेळ वाढवा, लसीचे दोन्ही लस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्या- काँग्रेस

हाॅटेल्स-रेस्टाॅरंट्स सुरू ठेवण्यासाठी अजूनही वेळेची मर्यादा असल्याने काँग्रेसने राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली आहे.

रेस्टाॅरंट्सची वेळ वाढवा, लसीचे दोन्ही लस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्या- काँग्रेस
SHARES

राज्य सरकारनं कोरोनाचा विळखा सैल झालेल्या जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेचे (bmc) आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी देखील मुंबई शहरासाठी नवे निर्देश जारी केले आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचे सर्वाधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

त्यानुसार मुंबईतील दुकानं आणि आस्थापना मंगळवारपासून आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. औषधाची दुकानं २४ तास खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु रेस्टाॅरंट्स आणि हॉटेल्स मात्र दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील. सरकारी आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार आहेत. हाॅटेल्स-रेस्टाॅरंट्स सुरू ठेवण्यासाठी अजूनही वेळेची मर्यादा असल्याने काँग्रेसने राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली आहे. 

इतर शहरांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने मुंबईतील रेस्टाॅरंट्सना देखील १० वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तसंच शाळांच्या बाबतीत देखील राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडताना आपली अर्थव्यवस्था तुटू नये, यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचं मत काँग्रेसचे (congress) मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी व्यक्त केलं आहे. 

तरण तलाव आणि निकट संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून अन्य खेळ आठवड्याचे सर्व दिवस नियमित वेळेनुसार खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रिकरणासही नियमित वेळेनुसार परवानगी देण्यात आली आहे. धार्मिकस्थळे, सिनेमा आणि नाट्यगृहे बंदच राहणार आहेत. 

सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मुंबई, ठाण्यात रेल्वे सेवेचा वापर करण्यास सर्वसामान्यांना परवानगी नसल्याने कर्मचारी कार्यालयांमध्ये येणार कसे, हा कळीचा मुद्दा आहे. रेल्वे सेवा सुरू नसल्याने १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अशक्यच आहे. 

त्यामुळेच कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीचे (covid19 vaccine) दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासही मुभा मिळावी अशी विनंती देखील जगताप यांनी केली आहे.  

मुंबईचा गेल्या दोन आठवड्यांतील संसर्ग दर (पॉझिटिव्हटी रेट) १.७६ टक्के, तर प्राणवायू खाटांच्या व्याप्तीचा सरासरी दर १८.९७ टक्के इतका आहे. ही बाब लक्षात घेऊन निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. 

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर जारी केलेल्या आदेशांचं पालन न करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६० आणि भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम १८८नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा या आदेशांमध्ये देण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा