मुंबईच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनचा फटका आता मुंबईच्या डबेवाल्यांना चांगलाच बसला आहे. कोरोनाकाळात लॉकडाऊन निर्बंध, कार्यालयात १० टक्के मनुष्यबळाला परवानगी आणि लोकलबंदी यामुळे सध्या सर्वच डबेवाले बेरोजगार झाले आहेत. या अडचणीच्या काळात रिक्षाचालकांप्रमाणेच डबेवाल्यांना ५ हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशननं केली आहे.
'ब्रेक द चेन' अंतर्गत महाराष्ट्र सरकार लॅाकडाउन शिथिल करणार आहे व लॅाकडाउनमध्ये १ जूनपासून काही घटकांना सवलती देणार आहे. या सवलतींमध्ये डबेवाल्यांनाही व्यवसाय करायला सवलत दिली गेली पाहिजे, असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी स्पष्ट केलं.
सध्या बहुतांशी डबेवाले कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी मिळेल ते काम करत आहेत. स्वयंरोजगार क्षेत्रातील डबा पोहोचविण्याचा व्यवसाय लॉकडाऊनमुळं पूर्ण ठप्प झाला आहे. काही डबेवाले जवळ अंतराचे डबे सायकलच्या माध्यमातून पोहचवत आहे. परंतु लांब अंतराचे डबे डबेवाल्याला पोहचवणं शक्य नाही. तेव्हा जेव्हा कधी लॅाकडाऊन चे नियम शिथिल केले जातील, त्यावेळी डबे पोहचवणारी सेवा आत्यावश्क सेवा मानून डबेवाल्याला लोकलनं प्रवास करू देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
अनेकांच्या सायकली पडून राहिल्यामुळं नादुरुस्त झाल्या असून अनेक सायकली निकामी झाल्या आहेत. त्यांच्या दुरुस्तीवरही खर्च येणार आहे. महाराष्ट्र सरकार लॉकडाउन काळात प्रत्येक रिक्षा चालकाला दीड हजार रुपये मदत म्हणून देत आहे. 'मुंबईतील डबेवाल्यांना सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करावी व ती मदत थेट डबेवाल्यांच्या बँक खात्यात जमा करावी. रिक्षाचालकांना मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता डबेवाल्यांनाही मदत देण्यात यावी, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशननं राज्य सरकारकडं केली आहे.
हेही वाचा -
मुंबईतील 'या' आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर
दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या