पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या आणखी दहा फेऱ्या वाढणार आहेत. आता एक नवीन वातानुकूलित लोकल सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर आणखी दहा वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर दररोज ४८ वातानुकूलित लोकल फेऱ्या होत होत्या. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे १ ऑक्टोबरपासून सामान्य लोकल फेऱ्यांच्या बदल्यात ३१ वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्यांची एकूण संख्या ७९ झाली आहे.
सध्या पश्चिम रेल्वेकडे सहा वातानुकूलित लोकल असून विद्युत उपकरणे लोकल डब्याखाली असलेली आणखी एक वातानुकुलीत लोकल सेवेत येणार आहे. या लोकलच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चाचण्या पूर्ण झाल्या असून ती चालवण्याचे नियोजन केले जात आहे.
सामान्य लोकलच्या बदल्यात ती चालवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दररोजच्या वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या ८९ होणार आहे.
बारा डब्याच्या सामान्य लोकलमध्ये पेंटाग्राफ आणि अन्य काही यंत्रणासाठी स्वतंत्र असे तीन मोटरकोच असतात. सध्या सेवेत असलेल्या भेल कंपनीच्या सहा वातानुकूलित लोकलमध्येही स्वतंत्र डबे आहेत.
मात्र येणाऱ्या सातव्या लोकलमध्ये विद्युत उपकरणे लोकल डब्याखाली बसविण्यात आली असून त्यामुळे सेवेत असलेल्या वातानुकूलित लोकलच्या तुलनेत काही प्रमाणात प्रवासी संख्या वाढण्यास मदत मिळणार आहे.
सेवेत असलेल्या वातानुकूलित लोकलमधून १ हजार २८ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असून हीच संख्या या नव्या प्रकारच्या वातानुकूलित लोकलमुळे १ हजार ११८ पेक्षा जास्त जाणार आहे.