Advertisement

प्रवाशांच्या तुलनेत लोकल फेऱ्या कमीच; धक्काबुक्की सहन करत करावा लागतोय प्रवास


प्रवाशांच्या तुलनेत लोकल फेऱ्या कमीच; धक्काबुक्की सहन करत करावा लागतोय प्रवास
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा (mumbai local train) सुरू करण्यात आली आहे. सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली आहे. मात्र, असं असलं तरी लोकल प्रवासावेळी या कर्मचाऱ्यांकडून सामाजिक अंतराच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची लोकलच्या दरवाजात मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याशिवाय, महिला प्रवाशांना (passengers) ही धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागत आहे.

वाढत्या प्रवासी संख्येला सामावून घेण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेने फेऱ्यांची संख्या वाढविली आहे. काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वे प्रशासनानं आपल्या सेवेत लोकल फेऱ्यांची (local services) वाढ केली. परंतु, ही वाढ प्रवाशांच्या तुलनेत कमीच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं प्रवाशांकडून लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. तसंच, महिलांचा प्रवास अजूनही खडतरच आहे. अपुऱ्या फे ऱ्या, त्यात महिलांसाठी राखीव डब्यांची अपुरी संख्या यांमुळे त्यांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. म्हणून महिला प्रवाशांकडून विशेष लोकल चालविण्याची मागणी होत आहे.

सध्या सरकारी, पालिका, रुग्णालय, पोलीस आदी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे ४२३, पश्चिम रेल्वे ५०० फेऱ्या चालवीत आहे. परंतु नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा या फेऱ्या कमीच आहेत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी गाड्यांना गर्दीच असते. त्याचप्रमाण येत्या काळात लोकल सेवा सुरू झाली किंवा प्रवाशांच्या तुलनेत लोकल फेऱ्यांची संख्या कमी असली तर कोरोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सामान्य प्रवाशांसाठी लोकलमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी संदीप देशपांडे यांनी 'कोरोनाने अनिल परब यांच्या कानात सांगितले आहे का की, एसटी सुरू झाल्यास करोना पसरणार नाही आणि रेल्वे सुरू झाल्यास होणार', असा सवालही केला होता. दरम्यान, मनसेच्या या आंदोलनाला काही संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळं येत्या काळात लोकल सेवा सामान्यांसाठी सुरू होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महिला प्रवाशांचेही हाल

लॉकडाऊनपूर्वी मध्य रेल्वेवर सकाळी व संध्याकाळी सीएसएमटी ते कल्याण ते सीएसएमटी २ आणि सीएसएमटी ते पनवेल ते सीएसएमटी २ लोकल फेऱ्या महिला विशेष होत्या. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरिवली १, चर्चगेट ते विरार ३ आणि बोरिवली ते चर्चगेट १, विरार ते चर्चगेट ३, भाईंदर ते चर्चगेट १ आणि वसई ते चर्चगेट १ अशा फेऱ्या होत्या. याशिवाय मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बरवर काही लोकल फेऱ्यांना सलग तीन डबे महिलांचे होते. परंतु आता ही सोय नसल्याने महिलांना गर्दीतून प्रवास करावा लागतो. गर्दी, धक्काबुक्की, एका आसनावर चार प्रवासी, उभ्या प्रवाशांची गर्दी असे आधीचेच वातावरण लोकलमध्ये असते.

१२ डबा लोकल गाड्यांमध्ये महिलांसाठी पूर्ण ३ द्वितीय श्रेणीचे डबे आणि ३ ५० टक्के  क्षमतेने (अर्धाच डबा) प्रथम श्रेणीचे डबे असतात. तर यातील अर्धा डबा प्रथम श्रेणी पुरुष प्रवाशांसाठी असतो. तर पूर्ण प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीचे मिळून पुरुषांसाठी ६ डबे असतात. परंतु हे डबे महिला प्रवाशांच्या तुलनेत अपुरे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी विशेष लोकल फेऱ्या सोडण्याची मागणी केली जात आहे.

सरकारी कार्यालयांत उपस्थिती वाढली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचीही संख्या वाढली आहे. महिलांना प्रवासात गर्दीचा सामना करावा लागत असून सामाजिक अंतरही राहत नाही.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय