Advertisement

कोविड लसीकरण पडताळणीतून सुटका, लोकल प्रवाशांना ई-पास मिळणार

ऑनलाईन ई-पास सुविधादेखील महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. जाणून घ्या ऑनलाईन पास कसा काढायचा

कोविड लसीकरण पडताळणीतून सुटका, लोकल प्रवाशांना ई-पास मिळणार
SHARES

ऑनलाईन ई-पास सुविधादेखील महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ असं त्याचं नाव आहे. या पद्धतीमुळे नागरिकांना प्रवासासाठी अतिशय सुलभतेनं ई-पास मिळवणं शक्य होणार आहे. त्यासाठी https://epassmsdma.mahait.org ही लिंक शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागानं अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि नागरिकांना ई-पास देण्यासाठी वेब लिंक यापूर्वीच विकसित केली आहे. सदर वेब लिंकचा उपयोग करून आता सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांना देखील मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी ई-पास उपलब्ध होणार आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि नागरिकांसाठी वापरात असलेल्या वेब लिंकमध्ये महाराष्ट्र राज्य शासनानं सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रवासाचा पास देण्याकरिता अतिरिक्त सुविधा उपलब्ध केली आहे. https://epassmsdma.mahait.org या लिंकचा उपयोग करून मुंबईकरांना आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास मिळू शकतील.

सदर लिंक सर्व वेब ब्राऊजरवर उपलब्ध असेल. हा ई-पास मोबाईलमध्ये जतन (Save) करून, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडकीवर सादर केल्यानंतर नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून थेट मासिक प्रवास पास उपलब्ध होईल. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पुन्हा ऑफलाईन पडताळणीची आवश्यकता राहणार नाही

या ई पास सुविधेनुसार, ज्या नागरिकांचे कोव्हिड लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत आणि दुसरा डोस घेवून किमान १४ दिवस पूर्ण झाले आहेत, ते नागरिक या ई पास साठी पात्र असतील. जे पात्र नागरिक पाससाठी अर्ज करतील, त्यांचे कोव्हिड लसीकरण पूर्ण झाल्याची (दुसरा डोस घेवून 14 दिवस पूर्ण झाल्याची) पडताळणी या लिंकवर आपोआप होईल. त्यासाठी वेगळ्या मानवी कार्यवाहीची आवश्यकता राहणार नाही.

कशी आहे युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास पद्धती

  • सर्वप्रथम पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
  • त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावं.
  • त्यानंतर नागरिकांनी आपला कोव्हिड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा.
  • लगेचच मोबाईलवर ओटीपी पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
  • हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.
    त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
  • त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसंच कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
  • या तपशिलामध्ये सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. मोबाईल गॅलरीतून छायाचित्र अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेऱ्याद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल.
  • ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करीता लघुसंदेश (एसएमएस) द्वारे लिंक प्राप्त होईल, असा संदेश झळकेल.
  • लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाईलमध्ये जतन (Save) करुन, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडकीवर सादर करावा, त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येईल.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा