आधीच गेल्या दोन महिन्यांपासून सातत्यानं होत असलेल्या इंधन दरवाढीमुळं सर्वसामान्य आधीच आर्थिक अडचणीत आलं आहे. त्यातच आता, लवकरच एमएमआरटीएच्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ निश्चित आहे. यापूर्वी डिसेंबरच्या बैठकीत हा निर्णय होणार होता. मात्र, तांत्रिक कारणानं दरवाढ टळली आता इंधन दरवाढीबरोबरच टॅक्सी,रिक्षा भाडेवाढीला सुद्धा नागरिकांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरातील रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीवर मागील अनेक वर्षांपासून निर्णय झाला नाही. कोविड १९ च्या काळात आधीच रस्त्यावर प्रवाशांची कमतरता आता त्यात भाडेवाढ केल्यास प्रवासी मिळणार नाही. त्यामुळं काही रिक्षा, टॅक्सी संघटनांनी भाडेवाढ थोडी पुढं ढकलावी अशी मागणी केली होती. त्यावरून गेल्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय होऊ शकला नाही. यामध्ये टॅक्सीचे ३ रुपये भाडेवाढ करून २२ ऐवजी २५ रुपये करावे तर रिक्षाचे २ रुपये वाढवून १८ ऐवजी २० रुपये करण्याची मागणी संघटनांची असून त्यासाठी राज्य सरकार सुद्धा सकारात्मक आहे.
एवढ्यात ही भाडेवाढीची घोषणा झाल्यास सर्वसामान्य दुहेरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. इंधनाच्या दराबरोबर, टॅक्सी, रिक्षाचे दर वाढल्यास सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय झाला नाही. एमएमआरटीएची बैठक लवकरच होणार असून, अद्याप तारीख मात्र निश्चित झाली नाही. त्यामध्ये टॅक्सी, रिक्षा भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे.