एसी लोकलची प्रतिक्षा संपणार, सप्टेंबरपासून प.रेल्वेवर धावणार

  Mumbai
  एसी लोकलची प्रतिक्षा संपणार, सप्टेंबरपासून प.रेल्वेवर धावणार
  मुंबई  -  

  येत्या सप्टेंबरपासून बहुचर्चित वातानुकूलित (एसी) लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या एसी लोकलचा लाभ सर्वात पहिल्यांदा पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मिळणार आहे. चाचणीच्या निमित्ताने मुंबईत सध्या एक एसी लोकल आहे. या लोकलपाठोपाठ आणखी 9 एसी लोकल पुढील काही महिन्यांत दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे बोर्ड सदस्य रवींद्र गुप्ता यांनी दिली.

  तब्बल 54 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेली ही 12 डब्यांची एसी लोकल साधारणत: वर्षभरापूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली होती. मध्य रेल्वेवरील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता या लोकलच्या चाचण्या पश्चिम रेल्वेवर सुरू आहेत. या चाचणीदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या दूर करून ही एसी लोकल सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेवर कार्यरत होईल. या लोकलचे भाडे अद्याप ठरवण्यात आलेले नाही. मात्र त्यावर लवकरच शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

  सीएसटी ते पनवेल कॉरीडॉर 'पीपीपी'च्या माध्यमातून
  सीएसटी ते पनवेल फास्ट कॉरीडॉर प्रकल्प 'सार्वजनिक खासगी सहकार्या'(पीपीपी)द्वारे पूर्ण केला जाईल. वांद्रे ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पासाठीही लवकरच करार होणे अपेक्षित आहे.

  अशी असेल वातानुकूलित लोकल -
  - एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात 15 टनांचे दोन एसी
  - स्टीलपासून बनवलेले वातानुकूलित कोच स्टील ग्रे आणि इंडिगो रंगात
  - प्रत्येक कोचमध्ये मोठ्या खिडक्‍या आणि दरवाजांसाठी विशेष रचना
  - या लोकलमधील 6-6 डबे आतून एकमेकांना गॅंगवेमार्फत जोडलेले असतील
  - या लोकलच्या डब्यांना ऑटोमॅटिक दरवाजे असतील
  - अडचणीच्या वेळी प्रवाशांना एका नॉबच्या सहाय्याने दरवाजे उघडता येतील
  - मोटरमनसोबत 'टॉक बॅक' यंत्रणेद्वारे संवाद साधता येईल
  - दोन सीटच्या अंतरात वाढ, गर्दीत उभे राहून प्रवाशांना प्रवास शक्‍य
  - नव्या पद्धतीचे हॅंडल आणि दरवाजातील खांब

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.