Advertisement

मुंबईत अवैध पार्किंगविरोधात मोहीम तीव्र

आता बाजारपेठांमध्ये जाणाऱ्यांना आपल्या वाहनांचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

मुंबईत अवैध पार्किंगविरोधात मोहीम तीव्र
SHARES

वाहतूक पोलिसांनी बाजारपेठांभोवती होणाऱ्या कोंडीवर उतारा म्हणून अवैध पार्किंगविरोधात मोहीम हाती घेतली असून रविवापर्यंत ती अधिक तीव्र केली जाणार आहे. दिवाळी तोंडावर असल्यानं खरेदीसाठी मोठ्या संख्येनं ग्राहक बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळं आता बाजारपेठांमध्ये जाणाऱ्यांना आपल्या वाहनांचीही काळजी घ्यावी लागणार आहे. 

क्रॉफर्ड मार्केटच्या अवतीभवती कपडे, विजेवर चालणारी उपकरणे, कंदील, रोषणाई, सजावटीचे साहित्य, फटाके , प्लास्टिक किंवा काचेची भांडी अशा विविध वस्तूंची घाऊक बाजारपेठ आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीपूर्वी खरेदीसाठी प्रचंड गर्दी होते आणि वाहतुकीचा बोजवारा उडतो. यंदा कोरोनाच्या धास्तीमुळे ग्राहकांची संख्या तुलनेने कमी असल्याचा दावा येथील व्यावसायिक करतात. मात्र वाहतूक पोलिसांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार लोकल सेवा बंद असल्यानं क्रॉफर्ड मार्केट, दादर, बोरिवली, कांदिवली, कुर्ला या आणि अशा अन्य उपनगरांमधील छोट्यामोठ्या बाजारपेठांमध्ये येणारी वाहनेही वाढतात.

मागील ५ दिवसांपासून बाजारपेठांमधील वाहनांची संख्या वाढल्यानं दुपारपासूनच दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर कोंडी होत आहे. त्यावर उतारा म्हणून वाहतूक पोलिसांनी क्रॉफर्ड मार्केटभोवती अडथळे लावून ग्राहकांची गर्दी रस्त्यावर येणार नाही, अशी व्यवस्था केली.

मुंबईतील प्रत्येक बाजारपेठभोवती वाहतूक कोंडी होत आहे. क्रॉफर्ड मार्केट इथं कोंडीचा प्रश्न तुलनेने अधिक गंभीर आहे. त्यावर उपाय म्हणून रस्त्याकडेला अवैधरीत्या उभी केली जाणारी वाहने जप्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी ३४ टोइंग व्हॅन आणि वाहने जागच्या जागी जप्त करण्यासाठीची यंत्रे (क्लँपर) प्रत्येक वाहतूक विभागाला उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा