चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर नवे बदल करून प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेली माथेरानची मिनी ट्रेन रविवारी पुन्हा एकदा रुळावरून घसरली. रविवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अमन लॉज ते माथेरान या मार्गावर ही ट्रेन जात असताना गाडीचे दोन चाक रुळावरून घसरले. दरम्यान या घटनेत कोणत्याही प्रकराची जीवितहानी झालेली नाही.
मिनी ट्रेनचा डबा घसरल्यामुळे ही सेवा पुर्ववत करण्यासाठी काही तासांचा अवधी लागला. दरम्यान अशीच घटना मे २०१६ मध्ये घडली होती. त्यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न विचरात घेऊन ही सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र यावर उपाययोजना करून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती.
यंदा पावसाळ्यात चार महिने ही सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी माथेरानच्या मिनी ट्रेनमध्ये काही बदल करण्यात आले होते. ट्रनेचे डबे पारदर्शक करण्यात आले होते. तसंच डब्यांवर माथेरानचे आकर्षित चित्र रेखाटण्यात आलं होतं. ज्यामुळं मिनी ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांना बाहेरच्या वातावरणाचा आनंद घेता येईल. मात्र, डबा घसरल्याची घटना पुन्हा एकदा घडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.