'तेजस'ला मिळणार दमदार इंजिन, वेग ताशी 200 किमी!

 Mumbai
'तेजस'ला मिळणार दमदार इंजिन, वेग ताशी 200 किमी!
Mumbai  -  

प्रवाशांना अत्याधुनिक सोई-सुविधा देत मुंबई-गोवा अंतर वेगात पार करणाऱ्या तेजस एक्स्प्रेसने साधारणत: महिन्याभरापूर्वी मैलाचा दगड गाठला. त्यापाठोपाठ 'तेजस' नवा अध्याय रचण्यास सज्ज झाली असून 'तेजस'ला लवकरच नवे लोकोमोटिव्ह इंजिन मिळणार आहे. या इंजिनला केवळ 'तेजस'करीताच डिझाईन करण्यात आले आहे. हे इंजिन लावताच 'तेजस' प्रति तास 200 किलोमीटर वेगाने धावू लागेल. वेगासोबतच या इंजिनमध्ये रेल्वेच्या सुरक्षेवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे.

कल्याण रेल्वे वर्कशॉपमध्ये या इंजिनाच्या चाचणी आणि परिक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. हे एक बहुपयोगी इंजिन असून या इंजिनाला आपत्कालीन परिस्थितीत आणि अपघात झाल्यानंतर कुठल्याही ट्रेनला सहज जोडता येईल. हे दमदार इंजिन 3100 बीएचपी शक्ती निर्माण करण्यास आणि 19.5 टन वजन वाहून नेण्यास सक्षम आहे.

सध्या 'तेजस'ला लावण्यात आलेले इंजिन ताशी 160 किमी वेगाने धावते. नवे इंजिन शुक्रवारी दक्षिण रेल्वेकडून मध्य रेल्वेच्या ताफ्यात सामील झाले. कल्याणच्या कारशेडमध्ये इंजिन दाखल होताच शनिवारी कर्मचाऱ्यांनी या इंजिनाचा ताबा घेत त्याचे रुपडे पालटण्याचे ठरवले. त्यानुसार जुन्या निळ्या रंगाऐवजी आता 'तेजस'चे इंजिन उगवत्या सूर्याच्या प्रतिमांनी सजले आहे.

या नव्या रंगसंगतीमुळे रुळांवरुन धावतानाही 'तेजस एक्स्प्रेस'चा रुबाब इंजिनापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत सारखाच असेल, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.

Loading Comments