Advertisement

प्रवाशांचा रेल्वे प्रवास होणार आणखी सुकर, नव्या रेल्वे मार्गिका येणार सेवेत

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध सुविधा सुरू करत आहेत.

प्रवाशांचा रेल्वे प्रवास होणार आणखी सुकर, नव्या रेल्वे मार्गिका येणार सेवेत
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध सुविधा सुरू करत आहेत. अशातच मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे ते दिवा ५व्या आणि ६व्या मार्गाच्या कामाला एमआरव्हीसी (मुंबई रेल्वे विकास महामंडळ), मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. रविवारी घेतलेल्या १० तासांच्या मेगाब्लॉकमध्ये रूळ, ओव्हरहेड वायरसह अनेक तांत्रिक कामे करण्यात आली. यापुढेही विविध कामांसाठी जानेवारी २०२२ पर्यंत मोठे मेगाब्लॉक घेतले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हा मार्ग २०२२ च्या पावसाळ्यापूर्वी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. यामुळे टप्प्याटप्यात मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते ठाणे व त्यापुढील मार्गावर ८० ते ८५ लोकल फेऱ्या वाढण्यास मदत मिळणार आहे. आतापर्यंत कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुल्र्यापर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या दहा वर्षांत ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला अनेक वेळा अंतिम मुदत देण्यात आली. विविध कारणांमुळे रखडलेल्या या कामावर करोना टाळेबंदीचाही परिणाम झाला. त्यामुळे आता २०२२ च्या पावसाळ्यापूर्वी पाचवी व सहावी मार्गिका पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कामाला गती दिली जात असून, गेल्या रविवारी कळवा ते मुंब्रादरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होता. यामध्ये सध्याचे रूळ थोडे बाजूला घेऊन ५व्या व ६व्या मार्गिकेच्या नवीन रुळांसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. त्यामुळं ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामेही मोठ्या प्रमाणात केली. यासाठी ३०० रेल्वे कर्मचारी कार्यरत होते. ब्लॉकमधील कामं ठरलेल्या वेळेतच पूर्ण केली. यापूर्वी २०१६ मध्ये १२ तासांचा मोठा मेगाब्लॉक घेतला होता. यानंतर नवीन मार्गिकेसाठी रूळ जोडणीच्याही कामांसह विविध कामं केली जाणार आहेत.

या कामांसाठी ऑक्टोबर महिन्यात प्रत्येकी ५ तासांचा ६ ब्लॉक घेण्याचे नियोजन आहे. परंतु, हे ब्लॉक मध्यरात्री घेतले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर जानेवारी २०२२ पर्यंत दहा तासांहून अधिक मोठे मेगा ब्लॉक घेतले जाणार असल्याचे समजतं. ठाणे ते दिवा पाचव्या व सहाव्या मार्गामुळे मेल-एक्स्प्रेस गाडय़ांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल. सध्या या पट्टय़ात स्वतंत्र मार्गिका नसल्याने मेल, एक्स्प्रेस व लोकल एकाच मार्गिकेवरून जातात. परिणामी, लोकलच्याही वेळापत्रकावर परिणाम होतो. ही मार्गिका झाल्यास ८० ते ८५ नवीन फेऱ्यांची भर पडेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा