Advertisement

मुंबईत अवजड वाहनांना पुन्हा 'नो एण्ट्री'


मुंबईत अवजड वाहनांना पुन्हा 'नो एण्ट्री'
SHARES

शहरात वाढलेली वाहनांची संख्या, ठिकठिकाणच्या रस्त्यांवर सुरू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प आणि अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना शहरात बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर खासगी वाहनचालकांनी आक्षेप घेतल्यानंतर बंदीच्या निर्णयावर सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या. त्यानुसार नियमात बदल करत वाहतूक पोलिसांनी दक्षिण मुंबईत पुन्हा एकदा अवजड वाहनांवर बंदी घालण्याचं ठरवलं आहे.


किती वाजेपर्यंत निर्बंध?

वाहतूक विभागाने दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम पुन्हा सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत वाहतूक पोलिसांनी यापूर्वी केलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. नवीन आदेशानुसार दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या खासगी बसेसना सकाळी ८ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री १ वाजेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.


कुणाला सूट?

या वाहनांना रात्री १ वाजेनंतर सकाळी ७ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत जाण्यास परवानगी असेल. तर दक्षिण मुंबई वगळता अन्य भागांत देखील अवजड वाहनांना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते १० या वेळेत निर्बंध असतील. मात्र या आदेशातून आपत्कालीन वाहने, सरकारी वाहने, एसटी, बेस्ट बस, स्कूल बस, प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचारी बस, पाणी-दूध-भाज्यांसारख्या अत्यावश्यक सेवा किंवा पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणारी वाहने, पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने या अत्यावश्यक वाहनांना सूट देण्यात आली आहे.



'पे अॅण्ड पार्किंग'

अत्यावशक सेवा पुरवणाऱ्या वाहनांनी स्वतः च्या अथवा भाड्याने घेतलेल्या जागेत तसेच अधिकृत 'पे अॅण्ड पार्क'मध्ये वाहने उभी करावीत. रस्त्यावर वाहने उभी केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाने जारी केले आहेत.

मेट्रोसारख्या विकासकामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या मार्गिका कमी झाल्या आहेत. काही रस्ते एक दिशा झाले आहेत तर काही ठिकाणची वाहतूक अन्य मार्गावर वळवण्यात आली आहे. दुपारच्या सुमारासही अवजड वाहने रस्त्यावर येत असल्याने शहरातील वाहतूककोंडीत भर पडत असल्याने या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं वाहतूक विभागाने स्पष्ट केलं आहे.


बसला ठराविक ठिकाणी प्रवेश

प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या खासगी बस वगळून अवजड वाहनांना दिवसभर शहरात बंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहनांना रात्री १ ते सकाळी ७ पर्यंत प्रवेश राहणार आहे. तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला देखील मुंबईच्या ठराविक मार्गांवर दुपारी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत प्रवेश देण्यात आला आहे.


कुठल्या मार्गांचा समावेश?

१) पी. डिमेलो मार्गावरील मायलेट जंक्शनपर्यंत २) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सरदार हाॅटेलपर्यंत ३) एन. एम. जोशी मार्गावर आर्थररोड नाक्यापर्यंत ४) डाॅ. अॅनी बेझंट रोडवर सेन्च्युरी मिलपर्यंत ५) सेनापती बापट मार्गावरील सर्व्हिस रोडवरील एल्फिन्स्टन जंक्शनपर्यत (सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपूल सोडून) 6) बॅ. नाथ पै मार्ग, रे रोड व पी. डिमेलो मार्गावरून बाजूचे रस्ते वापरून दक्षिण मुंबईत जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. वरील मार्गावर दुपारच्या सुमारास खासगी बसला परवानगी देण्यात आली आहे.



हेही वाचा-

मुंबईत अवजड वाहनांसह खासगी बसला 'नो एण्ट्री'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा