एसी लोकलमध्ये मालडब्याला जागाच नाही !

 Mumbai
एसी लोकलमध्ये मालडब्याला जागाच नाही !

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना गारेगार प्रावास करता यावा यासाठी लवकरच एसी लोकल चालवण्यात येणार आहे. पण या एसी लोकलमध्ये मालडबाच नसल्याने डबेवाल्यांसह व्यापारी आणि विक्रेत्यांची मोठी पंचाईत होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर येत्या सहा वर्षांत 66 एसी लोकल टप्प्याटप्याने दाखल केल्या जाणार आहेत. परंतु या सर्व एसी लोकलमध्ये मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मालडबाच नाही. त्यात मालवाहतुकीसाठी वेगळा डबा नसल्याने या गाडीतून आपला माल कसा न्यायचा, हा प्रश्न भविष्यात विक्रेत्यांसमोर उभा राहणार आहे. 

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान एमयूटीपी-3 या योजनेंतर्गत मुंबईत येणाऱ्या 47 नव्या लोकल आणि विरार-वसई-पनवेल या नव्या मार्गासाठी दाखल होणाऱ्या 19 लोकल पूर्णपणे वातानुकूलित करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. या एसी लोकल बारा डब्यांच्या असतील. या लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी टॉक बॅक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे असतील. एसी लोकलचे डबे हे मुंबईत धावणाऱ्या मेट्रोसारखेच असणार आहेत. परंतु या बारा डब्यांच्या एसी लोकलमध्ये मालडब्याला स्थान दिलेले नाही. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयावर डबेवाला असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे.

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा डबेवाला असोसिएशन निषेध व्यक्त करते. सध्या एक एसी लोकल आणली आहे त्यात मालडबा नाही. पुढे अजून 47 लोकल येणार आहेत. तेव्हा आम्ही काय करायचं? रेल्वे प्रशासनाला विनंती आहे की, रेल्वेत आत्ताच बदल करा नाहीतर रेल्वेने माल नेण्याचा मोठा पेच उभा राहील. या रेल्वेत प्रवशांच्या गर्दीत आम्ही डबे कसे पोहचवणार, याचा विचार रेल्वे प्रशासनाने करावा.

सुभाष तळेकर, प्रवक्ते, डबेवाला असोसिएशन

Loading Comments