Advertisement

ganesh festival 2020: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफ, सरकारचा मोठा निर्णय

दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ganesh festival 2020: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफ, सरकारचा मोठा निर्णय
SHARES

दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी गुरूवार १३ आॅगस्ट रोजी दिली. (no toll for konkan during ganesh festival 2020)

एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाची व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी खासगी वाहनाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना टोल सवलत मिळवण्यासाठी स्थानिक पोलीस स्थानकात जाऊन तिथं वाहन क्रमांक, वाहन मालकाचं नाव आणि प्रवासाची तारीख नोंदवावी लागेल. या नोंदणीनंतर प्रवाशांना टोल माफी स्टिकर मिळेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणं बंधनकारक असेल. सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ प्रादेशिक परिवहन अधिकारी  आणि पोलीस अधिकारी यांनी समन्वय ठेवून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याच्या सूचनाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

हेही वाचा हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?- आशिष शेलार

त्याशिवाय १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. पण यासाठी एसटीनं काही अटी ठेवल्या आहेत.  

प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड - १९ ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणं अनिवार्य आहे. सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यास संबंधितांना प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

ई पास नको, पण कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणा असा आदेश महामंडळानं काढला आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या टेस्टसाठी चाकरमान्यांना अडीच हजार मोजावे लागणार आहेत. १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सदर बसेस सोमवारी रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड -१९ ची चाचणी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. तसंच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही, असं महामंडळाकडून कळवण्यात आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा