Advertisement

हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?- आशिष शेलार

प्रवासादरम्यान जाचक अटींसोबत वाहतूककोंडी, पाऊस, खड्डे अशी इतरही अनेक विघ्न येत असल्याने चाकरमान्यांचे अक्षरश: हाल सुरू आहेत.

हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई?- आशिष शेलार
SHARES

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राज्य सरकारने चाकरमान्यांना एसटी बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर काही प्रवासी खासगी वाहनांनी कोकण गाठत आहेत. परंतु या प्रवासादरम्यान जाचक अटींसोबत वाहतूककोंडी, पाऊस, खड्डे अशी इतरही अनेक विघ्न येत असल्याने चाकरमान्यांचे अक्षरश: हाल सुरू आहेत. केंद्र सरकारकडून गणेशोत्सवासाठी रेल्वे ट्रेनची सोय उपलब्ध करून देण्यात येत असताना राज्य सरकारने हा प्रश्न रेंगाळत ठेवला. आता परतीच्या प्रवासासाठी तरी ट्रेनची सेवा उपलब्ध करून देण्याऐवजी तू-तू, मैं-मैं करत बसलेले हे मंत्री आहेत की,भांडखोर सासूबाई? असा प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. (bjp mla ashish shelar slams maharashtra government for not providing train facility to kokan during ganesh festival)

रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही? प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने हाल-हाल का केले? ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कुठला आणि कसला हा राग काढला? आम्ही वारंवार सांगितलं, रेल्वे तयार आहे पण ऐकलं नाही.. एसटी वेळेत दिली नाही. अवाजवी भाडं देऊन चाकरमान्यांना जावं लगत आहे. आता परतीच्या प्रवासाला तरी रेल्वे उपलब्ध करुन द्यायची सोडून मंत्री तू-तू -मै-मै करीत बसलेत. "पाडून दाखवा सरकारचे" हे मंत्री आहेत की, भांडखोर सासूबाई? असं आशिष शेलार म्हणाले.

हेही वाचा- Ganesh Utsav 2020 : कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीची 'ही' नवी अट

कुठलाही ठोस निर्णय नाही, कसलं नियोजन, समन्वय नाही, केवळ दुसऱ्याला दोष देऊन स्वतःचं अपयश झाकण्याचे कौशल या राज्यातील "पाडून दाखवा सरकारकडे"आहे. कोकणात रेल्वे गाड्या सोडण्यावरुन हेच सुरु आहे. रेल्वेची तयारी असतानाही गाड्या राज्य सरकारने सोडल्या नाहीत. चाकरमान्यांना त्रास दिला, असा आरोपही आशिष शेलार यांनी सरकारवर केला.

१३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशानुसार एसटी बस आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. पण यासाठी एसटीनं काही अटी ठेवल्या आहेत.  

प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशांनी कोविड - १९ ची चाचणी (RT- PCR Swab Test ) करणं अनिवार्य आहे. सदर चाचणी निगेटिव्ह (नकारात्मक ) असल्यास संबंधितांना प्रवास करता येईल, अशी अट ठेवण्यात आली आहे. यासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकावर बस उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.

ई पास नको, पण कोविड टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणा असा आदेश महामंडळानं काढला आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या टेस्टसाठी चाकरमान्यांना अडीच हजार मोजावे लागणार आहेत. १३ ते २१ ऑगस्ट दरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सदर बसेस सोमवारी रात्रीपासून आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध असतील. आरक्षण केल्यानंतर प्रवासापूर्वी संबंधित प्रवाशाची कोविड -१९ ची चाचणी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आल्यास त्यांना आरक्षण रद्द करता येणार नाही. तसंच प्रवासासाठी स्वतंत्ररित्या ई-पासची आवश्यकता असणार नाही, असं महामंडळाकडून कळवण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement