ओलासोबत करा मुंबई दर्शन

  Mumbai
  ओलासोबत करा मुंबई दर्शन
  मुंबई  -  

  एका बाजूला राज्याचे परिवहन मंत्रालय ओला, उबेर या अॅपटॅक्सींवर बंधने टाण्यासाठी पावले उचलत आहे. तर राज्याच्या पर्यटन विभाग ओला कंपनीसोबत सामंजस्य करार करून ओला कंपनीमार्फत मुंबई दर्शनचा एक वेगळा उपक्रम राबवत आहे. 

  पर्यटन विभागाने 2017 हे वर्ष 'व्हिजिट महाराष्ट्र' म्हणून जाहीर केले आहे. यासाठी पर्यटन विभागाने महाराष्ट्र पर्यटन हा एक ब्रँड म्हणून प्रस्थापित व्हावा, यासाठी अनेक उपाययोजना राबवण्याचं ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत बुधवारी ओला कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. भाडे आकारणीच्या सेवेअंतर्गत याचा समावेश करण्यात आला आहे. याद्वारे मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांना शहराच्या पर्यटनाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. 10 तास किंवा 100 किमी अशा प्रकारच्या पॅकेजमध्ये मुंबईतील 10 प्रमुख ठिकाणांना भेट दिली जाईल. यात जुहू बीच, मन्नत बंगला, हाजी अली, मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया, सिद्धिविनायक मंदिराचा समावेश असेल.

  पर्यटकांना एकत्रित पद्धतीने सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एमटीडीसीने ही योजना राबवली आहे. पर्यटक मुंबईत आल्यापासून त्यांना वाहतूक सुविधा, गाईड, पर्यटनस्थळे, शॉपिंगची स्थळे, निवासी व्यवस्था, रेस्टॉरंट अशा सर्व सुविधा खात्रीशीर आणि सुरक्षित पद्धतीने मिळाव्यात यासाठी एमटीडीसी प्रयत्नात आहे. प्राथमिक टप्प्यात मुंबईत ही सुविधा सुरू करण्यात आली असून लवकरच राज्यभरात त्याचा विस्तार करण्यात येईल. याशिवाय सध्या मुंबईत 100 तरुणांना तर उर्वरीत महाराष्ट्रात 400 तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याद्वारे या तरुणांनाही रोजगार उपलब्ध होणार असून हे तरुण लवकरच पर्यटन सेवेत दाखल होतील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.