ऑनलाइन तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांना आता रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया न करताच तिकिटांचे पैसे त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार आहेत. तर तिकीट खिडकीवरून तिकिटे काढली असतील त्यांना परतावा मिळवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
ऑनलाइन तिकीट खरेदी केलेल्या प्रवाशांना तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया न करताच तिकिटांचे पैसे त्यांच्या बँक खात्यांमध्ये वळते करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. १४ एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंतच्या सर्व रेल्वे गाड्यांची तिकिटे रेल्वेने रद्द केली आहेत.यात तिकीट खिडकीवरून आणि ऑनलाइन पद्धतीने काढलेल्या तिकिटांचा समावेश आहे. रेल्वे स्थानक आणि स्थानकाबाहेरील अधिकृत तिकीट आरक्षण केंद्रे सध्या बंदच राहणार आहेत. यामुळे प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी धावपळ करू नये. ऑनलाइन पद्धतीने तिकिटे काढलेल्यांचा परतावा थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा होईल. ज्यांनी तिकीट खिडकीवरून तिकिटे काढली असतील त्यांना परतावा मिळवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या अवधीत त्यांना त्यासाठीची रीतसर प्रक्रिया करता येईल, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर भारतीय रेल्वेनेही १४ एप्रिलपर्यंत देशभरात धावणाऱ्या सर्व प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सर्वत्र धावणाऱ्या मेल, एक्स्प्रेस, प्रीमियम, पॅसेंजर, उपनगरीय गाड्या, तसेच कोलकाता मेट्रो १४ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी रेल्वे मंत्रालयाने केली. यापूर्वी भारतीय रेल्वेने २२ ते ३१ मार्चपर्यंत सर्व गाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती. देशातील विविध भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्यांची वाहतूक मात्र सुरूच राहणार आहे. १४ एप्रिल रात्री १२ वाजेनंतर ई-तिकिटांचे आरक्षण करण्याची सुविधा पुन्हा प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, असे रेल्वे मंडळाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद
Coronavirus Updates: प्रभादेवीत 'त्या' महिलेला करोनाची लागण