Advertisement

नाशिककरांना दिलासा, पंचवटी एक्सप्रेस शुक्रवारपासून सुरू

रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, तपोवन, राज्यराणी एक्स्प्रेसही सुरू करण्यात येणार आहे. तर मुंबई-पुणे प्रवासासाठी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन येत्या २६ तारखेपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे.

नाशिककरांना दिलासा, पंचवटी एक्सप्रेस शुक्रवारपासून सुरू
SHARES

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने नाशिककरांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई-नाशिक (mumbai-nashik) प्रवासासाठी पंचवटी आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार प्रदीर्घ कालखंडानंतर शुक्रवारपासून (ता. २५) पंचवटी एक्स्प्रेस (Panchavati Express) सुरू आहे. 

कोरोनाच्या उद्रेकामुळे एप्रिल २०२० पासून पंचवटी एक्स्प्रेस बंद आहे. त्यामुळे अनेकांच्या रोजगारावर परिणाम झाला होता. आता पंचवटी एक्स्प्रेस सुरू होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान,  चाकरमान्यांसाठी या गाडीला पास मंजूर करावा, अशी मागणी प्रवासी संघटनेसह रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी केली.

रेल्वे प्रशासनाकडून राजधानी, तपोवन, राज्यराणी एक्स्प्रेसही सुरू करण्यात येणार आहे. तर मुंबई-पुणे प्रवासासाठी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन येत्या २६ तारखेपासून पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. आता डेक्कन क्वीनला विस्टाडोम कोच जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अजून आनंदी व सुखकारक होईल.

२६ जूनपासून मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी ७ वाजता सुटेल, ती सकाळी ११.०५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. पुण्यातून ही गाडी दर दिवशी दुपारी ३.१५ वाजता सुटून संध्याकाळी ७.०५ वाजता मुंबईत पोहोचेल. प्रवासासह परिसरातील निसर्गाचा प्रवाशांना पुरेपूर आनंद देण्याच्या दृष्टीने रेल्वेने विस्टाडोम डब्यांची संकल्पना आणली आहे. सध्या मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला अशा प्रकारचा डबा जोडण्यात येत आहे. त्यातून कोकण आणि गोव्यापर्यंतच्या निसर्गाची अनुभूती प्रवाशांना मिळते आहे.

व्हिस्टाडोम कोच ४० सीटर ३६० डिग्री व्ह्यू कोच आहे, ज्याला काचेचे छत आहे. या काचेच्या छतामुळे प्रवाशांना बाहेरील मनमोहक दृश्याचा आनंद घेता येतो. प्रवाशांना पर्यटनासाठी उत्तम अनुभव मिळावा यासाठी कोचमध्ये रुंद खिडक्या विंडो पॅन आणि ३६० अंशांपर्यंत फिरणाऱ्या खुर्च्या आहेत.

व्हिस्टाडोम कोच विशेषतः पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून तयार केले गेले आहेत. या कोचची खास अशी रचना केली गेली आहे की १८० किमी पर्यंत सहज वेग पकडू शकेल. या कोचमध्ये प्रवास करताना, प्रवासी त्यांच्या आरामदायक सीटवर बसून बाहेरचे दृश्य पाहू शकतील. वाय-फाय सह प्रवासी माहिती प्रणाली, स्वयंचलित आणि मोठे स्लायडिंग दरवाजे प्रवास अधिक मनोरंजक बनवतात.



हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा