Advertisement

Coronavirus Update: प्रवाशांनी एसटीकडं पाठ फिरवल्यानं महसुलात घट

करोना व्हायरसमुळं एसटी महामंडळ (MSRTC) व मध्य रेल्वेला (Central Railway) फटका बसला आहे.

Coronavirus Update: प्रवाशांनी एसटीकडं पाठ फिरवल्यानं महसुलात घट
SHARES

करोना व्हायरसमुळं एसटी महामंडळ (MSRTC) व मध्य रेल्वेला (Central Railway) फटका बसला आहे. प्रवासी वर्क फ्रॉम होम (Work From Home) करत असल्यानं एसटी महामंडळाच्या महसूलात घट झाली आहे. ११ मार्च ते १५ मार्चकालावधीत एसटी महामंडळाला एकूण ७ हजार ७०० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे १ कोटी ४३ लाख रुपये महसूल बुडाल्याची माहिती मिळते.

एसटीच्या शिवनेरी बसकडंही प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मध्य रेल्वेवर ४ मार्चनंतर मेल-एक्स्प्रेस गाड्यांचं तिकीट प्रवाशांकडून रद्द करण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलं आहे. त्याशिवाय, एसटी महामंडळाचे १ मार्चपासून 'प्रवासी वाढवा' अभियान सुरू आहे. परंतु, यामध्येही अडथळा निर्माण झाला आहे.

'मुंबई ते पुणे ते मुंबई’, 'ठाणे ते पुणे ते ठाणे' मार्गावर एसी शिवनेरी बस गाड्या धावतात. परंतु, मागील ५ दिवसांत या फेऱ्यांमधून कमी प्रवासी जात असून, काही फेऱ्यांसाठी प्रवासीच नसल्यानं २०७ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे शिवनेरीतून मिळणारे एकूण १५ लाख रुपये महसूल बुडाला आहे. एसटीच्या दररोज १८ हजार फेऱ्या होताता आणि २२ कोटी रुपये महसूल मिळतो.

राज्याच्या पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागातील एकूण ३ हजार ६२० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ मुंबई, रायगड, ठाण्यातील एकूण २ हजार १८१ फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते.

सुट्टी निमित्त गावी व बाहेरगावी जाण्याऱ्या प्रवाशांनी मेल-एक्स्प्रेसचं तिकीट रद्द केलं आहे. त्यामुळं मध्य रेल्वेचा महसूल बुडत आहे. ४ मार्चपासून प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यास सुरुवात केली असून, ४ मार्च ते ११ मार्च २०१९ शी तुलना करता २०२० मधील याच काळात रद्द करण्याचे प्रमाण दुपटीने वाढल्याचे समोर आलं आहे. ११ मार्चला २९ हजार १९२ प्रवाशांनी तिकीट रद्द केल्यानं त्यांना एकूण १ कोटी रुपयांहून अधिक तिकीटांचा परतावा द्यावा लागला.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल बंद ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचं म्हटलं. या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्र्यांना लोकल बंद करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर त्यांनी 'मुंबईच्या लोकल (mumbai local train) ट्रेनमध्ये रोज गर्दी ओसंडून वाहत आहे. कोरोना संदर्भात काळजी घेण्यासंदर्भातले सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत. प्रवासी एकमेकांना अक्षरश: खेटून प्रवास करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग (coronavirus) वाढण्याचा मोठा धोका आहे. मुंबईच्या लोकल ट्रेनमधील गर्दी आरोग्य विभागाअंतर्गत येत नसली, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकाेनातून आम्हाला नक्कीच त्याची चिंता वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री या विषयी संवेदनशील असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकल ट्रेनसोबत, मेट्रो इ. विषयांवर नक्कीच चर्चा करण्यात येईल’, असं म्हटलं.



हेही वाचा -

मुंबईतील लोकल ट्रेन, मेट्रो बंद करणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं हे उत्तर

राज्यातील खासगी कंपन्या बंद ठेवणार, सरकारसोबतच्या बैठकीत निर्णय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा