मुंबईसह (mumbai) पुण्यात (pune) कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कडक निर्बंध लावले आहेत. या कडक निर्बंधांमुळं सर्व-सामान्यांचा प्रवास थांबला असून, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळं याचा फटका आता रेल्वे वाहतुकीला बसतो आहे. कारण प्रवासी संख्या कमी झाल्यानं पुणे -मुंबई- पुणे दरम्यान धावणारी एकमेव डेक्कन क्वीन ही गाडी शुक्रवार १४ मेपासून रद्द करण्यात आली आहे.
पुणे -मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये रेल्वेच्या या निर्णयामुळं प्रचंड असंतोष पसरला आहे. गतवर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन झाल्यापासून रेल्वे सेवा बंद झाल्यानं दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
प्रवाशांना भर पावसाळ्यात खासगी वाहनानं, दुचाकीनं आपला जीव धोक्यात घालून आर्थिक नुकसान सहन करून प्रवास करावा लागला होता. ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीन ही एकमेव गाडी सुरू करण्यात आली. त्यातही आरक्षण करूनच प्रवास करावा लागत होता. तरी या प्रवाशांनी कित्येक महिने दरमहा ४ ते ५ हजार रूपये खर्चून रेल्वेनं प्रवास केला.
कोरोनाच्या महामारीचं संकट असतानाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत होते. रेल्वेचे अधिकारी केवळ फायदा तोट्याच्याच विचार करतात. दैनंदिन प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा जराही विचार केला जात नाही. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे हजारो खासगी कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
राज्य सरकारी, बॅंक, पोलीस, आरोग्य विभाग, महापालिका, रेल्वे, विद्युत विभाग यासह खासगी क्षेत्रातील हजारो चाकरमान्यांना या गाडीने प्रवास करावा लागतो. कामाच्या ठिकाणी कसे जावे, हा मोठा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. या सर्व प्रवाशांना आता मोठ्या प्रमाणात त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
हेही वाचा -
Cyclone Tauktae : मुंबईसह 'या' भागात जोरदार पावसाची शक्यता, पालिका लागली कामाला