Advertisement

बेजबाबदारपणाचा कळस !


बेजबाबदारपणाचा कळस !
SHARES

सानपाडा रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री एक तरुण चालत्या लोकल ट्रेनमधून उतरण्याच्या नादात फलाटावर उताणा पडतो. डोक्याला मार लागून निपचित पडलेल्या या तरुणाचा तिथंच उपस्थित रेल्वे पोलीस, होमगार्ड यांच्या बेफिकीरीमुळे जीव जातो... स्टेशनवर निपचित पडलेल्या त्या तरुणाला प्राथमिक उपचार देणं दूरच, उलट, हे वर्दीवाले त्याच फलाटावर आलेल्या दुसऱ्या ट्रेनमध्ये त्या जखमी तरुणाला उचलून टाकतात आणि स्वतःच्या जबाबदारीतून पळ काढतात... (प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्हीमुळे ही घटना अंगावर शहारा आणणारी ठरली...)

योगायोग म्हणजे, ही बातमी आली त्याच दिवशी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी देशभरात दोन दिवसांत झालेल्या रेल्वे अपघातांची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देऊ केला. अर्थात, पंतप्रधानांनी तो स्वीकारला नसला तरी किमान प्रभूंनी नैतिकता दाखवली, असेच म्हणावे लागेल. परंतु, प्रभूसाहेब तुमची नैतिकता तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये कधी परावर्तित होईल?



...तर, सानपाड्याची बातमी सीसीटीव्हीच्या पुराव्यासह समोर आल्याने संबंधित जीआरपी पोलीसावर निलंबनाचा आणि होमगार्डवर बडतर्फीच्या कारवाईचा बडगा उगारला तरी गेला. परंतु, जेव्हा खरी गरज होती तेव्हा संबंधितांनी जे काही कृत्य केले ते निश्चितच मानवीय नव्हते. त्यामुळे, या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी.




ज्या तरुणाचा मृत्यू झाला त्याची या सर्वात काय चूक होती? चालत्या गाडीतून उतरणे हा दंडनीय अपराध आहे ना, मग त्याच्याकडून दंडवसुली करायची होती. पण त्याला उपचारच न देणे हा त्याहून अधिक कठोर अपराध नाही का ठरत?

रेल्वेचे अधिकृत तिकीट काढून प्रवास करणाऱ्याला जी सेवा मिळायला हवी ती तर मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांना कधीच मिळत नाही. रेल्वेचा सर्वाधिक महसूल मुंबईतून निर्माण होत असला तरी सर्वात जास्त त्रास मुंबईतील रेल्वे प्रवाशांनाच सहन करावा लागतो. दररोज किमान 10 ते 12 जणांचा बळी घेणारी ही रेल्वे मुंबईची जीवनवाहिनी म्हणवली जाते, यासारखा विरोधाभास नाही.

रेल्वे अपघातांमध्ये बहुतांश वेळा पोलीस पंचानामा लिहिताना प्रवाशांवरच खापर फोडतात आणि त्यामुळे रेल्वे ट्रिब्युनलकडे शेकडो खटले जमा होत राहतात. आधीच प्रवाशाचा जीव गेलेला असतो किंवा अपंगत्व आलेले असते. त्यात, कायद्याचा बडगा त्रासदायक ठरू नये म्हणून बहुतांश प्रवाशांचे नातेवाईक नशिबाला दोष देत गेलेल्यांचे तेरावे करून दुःख विसरण्याचा प्रयत्न करतात. किंवा, अपंग झालेले स्वतःच्या कर्माला जबाबदार धरून आयुष्याची दोरी बळकट होती, असा स्वतःलाच दिलासा देत राहतात.

या सर्व अपघातांमध्ये कळीचा मुद्दा ठरतो तो म्हणजे, रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा. क्विक रिस्पॉन्स टीम वगैरे ही कागदावर असली तरी प्रत्यक्षात रेल्वे स्थानकांवर किंवा त्या परिसरात अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या सेवेबाबत आजही अनेक तक्रारी आहेत.

एकूणच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वागण्याबाबत, शैथिल्याबाबत, सर्व थरांतून तक्रारींचा पाऊस पडत असतो. विशिष्ट प्रांतांच्या, जातीच्या, युनियनबाजीच्या दबावांमुळे रेल्वे प्रशासन पोखरले गेले आहे. या सर्व कठीण आव्हानांना पेलून या रेल्वेला सरळ करण्याची अपेक्षा रेल्वेमंत्र्यांकडून आहे.

प्रभूसाहेब, राजीनाम्याने प्रश्न सुटण्याची हमी देत असाल तर आम्हाला संपूर्ण संसदेचाच राजीनामा घ्यायला आवडेल. पण, तुमच्यासारख्या नेत्यांना जनतेने तिथे चांगले काहीतरी करण्यासाठी निवडून दिले आहे, हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार कच न खाता कठोर कामगिरी करण्यावर भर द्या. तुम्ही अगदी छोट्या छोट्या ट्विट्सचीही दखल घेऊन रेल्वे प्रशासनाला जागे केले म्हणून अनेकांना तुमच्याबद्दल आदर, कौतुक आहे. त्या प्रतिमेनुसारच तुम्ही यापुढेही कार्यरत राहा. पण, आता तुमच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणाबरोबरच माणुसकीही शिकवा असे सांगणे भाग आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा