'त्या' प्रवाशाच्या मृत्यूस जबाबदार कोण?


'त्या' प्रवाशाच्या मृत्यूस जबाबदार कोण?
SHARES

भावनाहीन, निर्दयी अशी दूषणे नेहमीच पोलिसांना दिली जातात. मात्र, जीआरपीच्या एका शिपायाने हे सगळे खरे करून दाखवले आहे. नवी मुंबईच्या सानपाडा स्थानकात एका जखमी अवस्थेत पडलेल्या प्रवाशाला रुग्णालयात नेण्याऐवजी जीआरपीच्या शिपायाने होमगार्डच्या मदतीने त्याला ट्रेनमध्ये फेकून काढता पाय घेतला. त्यामुळे, योग्य वेळी उपचार न मिळाल्याने त्या जखमी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.



जखमी प्रवाशाचा मृत्यू

22 आणि 23 जुलैच्या दरम्यान सानपाडा स्थानकात हा धक्कादायक प्रकार घडला. पनवेल गाडी सानपाडा स्थानकातून सुटल्यानंतर उतरण्याच्या नादात एक प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडला. हा प्रवासी उतरत असताना ट्रेनने वेग धरला होता. त्यामुळे, उतरताना हा प्रवासी डोक्यावरच आपटला. ट्रेन गेल्यानंतर देखील हा प्रवासी फलाटावरच निपचित पडला होता.

काही मिनिटांतच एक जीआरपीचा हावालदार तिथे आला. या जखमी प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात नेण्याचे सोडून हा शिपाई ठोंब्यासारखा तिथेच थांबला. त्याने प्रवाशाला प्रथोमोपचार देणे सोडाच, त्याला नीट बघायची देखील तत्परता दाखवली नाही. 15 मिनिटांनी मागची ट्रेन येईपर्यंत हा निर्दयी हवालदार चक्क तिथेच उभा होता.



कहर तर तेव्हा झाला, जेव्हा 15 मिनिटांनी दुसरी ट्रेन आली. ट्रेन येताच या जीआरपीच्या शिपायाने एका होमगार्डच्या मदतीने या जखमी प्रवाशाला चक्क ट्रेनमध्ये भिरकावून दिले. पुढे त्या प्रवाशाला कोण बघेल, त्याला हॉस्पिटलमध्ये कोण नेईल, त्याच्या नातेवाईकांना कोण सांगेल, याचा कोणताही विचार न करता या दोघांनी तिथूनच काढता पाय घेतला.

दुर्दैवाने, ती गाडी सानपाड्याहून पनवेलला गेली आणि नंतर पुढे यार्डात गेली. तोवर त्या जखमी प्रवाशाकडे कुणीच लक्ष दिले नाही किंवा कुणाच्या लक्षात आले नाही. अखेर, दुसऱ्या दिवशी दुपारी हा प्रकार लक्षात आला.


दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी ट्रेनमध्ये आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना हा निपचित पडलेला प्रवासी सापडला. तेव्हा, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी जीआरपीमध्ये रेल्वेचे पोलिस उपायुक्त समाधान पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्या शिपायाला निलंबित केले असून त्याची खात्यांतर्गत चौकशी सुरू आहे तसेच, संबंधित होमगार्डलाही कामावरून कमी केल्याचे त्यांनी `मुंबई लाइव्ह`ला सांगितले.



जखमी प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात नेण्याची त्या जीआरपी शिपायाची जबाबदारी होती. जर तसे केले असते तर त्याचे प्राण नक्कीच वाचले असते. त्यामुळे त्याच्या मृत्यूला तो शिपाई देखील जबाबदार आहे. नुसते निलंबित करून आणि चौकशी करून काही होणार नाही. तर, त्या जीआरपी शिपायाला विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

- समीर झवेरी, रेल्वे कार्यकर्ते


हेही वाचा - 

आठवड्याभरात रेल्वे अपघातात ५६ मृत्यू, ७६ जखमी

मुंबईची लाइफलाइन ठरतेय डेथलाइन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा