वाढत्या घातपाताच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिस सज्ज

 Tilak Nagar
वाढत्या घातपाताच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे पोलिस सज्ज
Tilak Nagar, Mumbai  -  

दहशतवादी तसेच देशविघातक घटकांकडून लोहमार्गाला लक्ष करून अनेक घातपात घडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर दिवसेंदिवस सतर्क राहण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे लोहमार्ग पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशाने वडाळा रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्गावरील वाढत्या घातपाताबाबत सतर्कतेचा इशारा देण्यासाठी टिळक नगर रेल्वे स्थानक फलाट क्र.2 येथील रेल्वे रुळा लगतच्या जय हनुमान नगर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची बुधवारी बैठक घेण्यात आली.

या बैठकीत उपस्थितांना रेल्वे हद्दीत घडलेल्या घातपाताच्या अनुषंगाने सुचना आणि मार्गदर्शन करण्यात आले. त्यात रेल्वे रुळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालू नका , पादचारी पुलाचा वापर करावा, धावत्या रेल्वे गाडीमध्ये दरवाज्यामध्ये उभे राहून प्रवास करू नये, तसेच धावत्या लोकल गाडीवर सांडपाणी, दगड अथवा तत्सम वस्तू फेकू नये, त्याचप्रमाणे रेल्वे रूळ परिसरात सतर्क राहण्याचा आणि संशयीत इसम अथवा वस्तू दिसल्यास वडाळा रेल्वे पोलिस ठाणे भ्रमणध्वनी क्रमांक 022-24164688, रेल्वे पोलिस हेल्पलाईन क्रमांक 9833331111 किंवा आरपीएफ हेल्पलाईन क्रमांक 182 यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उप-निरीक्षक अनिल बर्वे यांनी बैठकीत केले. यावेळी पोलिस हवालदार मंगेश साळवी, पोलिस नाईक भीमराव चव्हाण, पोलिस शिपाई विलास पाटील, महिला होमगार्ड आणि स्थानिक रहिवाशी या बैठकीस हजर होते.

Loading Comments