Advertisement

'राज्यराणी' झाली 'तुतारी' एक्स्प्रेस!


'राज्यराणी' झाली 'तुतारी' एक्स्प्रेस!
SHARES

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर-सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्स्प्रेसला 'तुतारी' एक्स्प्रेस नाव देण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. अखेर सोमवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते हे नामकरण करण्यात आले असून, या पुढे ही गाडी 'तुतारी एक्स्प्रेस' म्हणून ओळखली जाणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मागील सात ते आठ वर्षांपासून कवी केशवसुतांच्या सन्मानार्थ कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका गाडीला त्यांची गाजलेली कविता 'तुतारी'चे नाव द्यावे अशी मागणी करण्यात येत होती. अखेर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही मागणी मान्य केली. त्यानुसार सोमवारी या गाडीच्या नामकरणाचा सोहळा सुरेश प्रभू यांच्या हस्ते पार पडला.

सोमवारी दुपारी 3.30 वाजता कोहिनूर हॉलमध्ये नामकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेेचे खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या कार्यक्रमाला उपस्थित होते.

'तुतारी' ही क्रांतिकारी कविता असल्याने केशवसुतांचे नाव देशपातळीवर जोडले जावे याकरता संपूर्ण देशाला जोडणाऱ्या भारतीय रेल्वेतील ट्रेनला या कवितेचे नाव देण्यात आले आहे. राज्यराणी एक्स्प्रेस 1 जुलै 2011 रोजी कोकण रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली होती. गेल्या सहा वर्षांत राज्यराणी एक्स्प्रेसने कोकण रेल्वेच्या यशात मोलाची कामगिरी बजावली आहे. मात्र आता सोमवारपासून ही रेल्वे 'तुतारी एक्स्प्रेस' या नावाने ओळखली जाणार आहे. आधुनिकतेकडे जाताना साहित्यकाची गरज असून साहित्य निर्मितीमुळेच समाज शाश्वत होतो..केशवसुतांच्या कवितेचे नाव म्हणजे रेल्वेचा सन्मान असल्याची भावना प्रभूंनी त्यावेळी व्यक्त केली.

रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजलीनंतर केशवसुतांची तुतारी देशात गाजेल. तब्बल १० वर्षांनंतर पहिली मागणी पूर्ण झाली आहे. केशवसुत्याच्या तुतारी चे नाव एक्सप्रेस ला देण्यात आले त्याचा आम्हा आनंद आहे.
- मधू मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा