Advertisement

"प्रवाशांचा उद्रेक होण्यापूर्वी लोकलचे दरवाजे खुले करा"

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली लोकल आता हळुहळू पूर्वपदावर येत आहे.

"प्रवाशांचा उद्रेक होण्यापूर्वी लोकलचे दरवाजे खुले करा"
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली लोकल आता हळुहळू पूर्वपदावर येत आहे. आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह, वकील, महिला प्रवाशी, डबेवाले, बँक कर्मचारी यांसह अनेकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. परंतू, सर्वसामान्य पुरुष अद्याप परवानगी नाही. वकिलांना न्यायालयात वेळेवर कामकाज सुरू करता यावे, यासाठी सकाळी ८ ते ११ या गर्दीच्या वेळेत लोकलप्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली. सर्वसामान्य प्रवासी हादेखील कामावर जाण्यासाठीच लोकलचा वापर करतो. यामुळे आता गर्दीचे कारण पुढे करून आणखी प्रतीक्षा करायला न लावता सरकारने सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय लवकर घ्यावा, अशी भूमिका रेल्वे प्रवासी संघटनांनी मांडली आहे.

कोरोना वगळता कर्करोग, टीबी, डायलिसीस अशा खर्चिक आजारांवरील उपचारांसाठी कल्याण, कसारा, बदलापूर, पालघर येथील नागरिकांना मुंबईतील रुग्णालयात यावे लागते. रुग्णांसह नातेवाईंकाना रस्तेमार्गे प्रवास परवडत नाही. वाहतूक कोंडीत रुग्ण दगावण्याची भीती अधिकच असते. यामुळे सरकारनं विनाविलंब सर्वांसाठी लोकल सुरू करावी, असं प्रवासी संघटनेचं म्हणणं आहे.

सकाळी गर्दीच्या वेळेत मर्जीतील प्रवासी वर्गाला प्रवेश देण्याचे धोरण या अधिकाऱ्यांकडून सुरूच आहे. हेच वकिलांच्या प्रवासावरून पुन्हा स्पष्ट झाले. यामुळे ९ महिन्यांपासून सर्वांसाठी बंद असलेल्या लोकलचे दरवाजे प्रवाशांचा उद्रेक होण्यापूर्वी खुले करावे, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली.

इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचा रस्तेमार्गे प्रवास दिवसेंदिवस अधिकच कष्टप्रद, खर्चिक होत आहे. कोट्यवधींचा खर्च करून ही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात महापालिका, बांधकाम विभाग या सरकारी यंत्रणा वारंवार अपयशी ठरत आहे. वाहतूक कोंडीही जैसे-थेच आहे. याचा आर्थिक फटका आणि मानसिक त्रास हा सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा