Advertisement

रिक्षा-टॅक्सी उपलब्ध आहे का? हे आता 'या' यंत्रेणेवरून कळणार

काळी-पिवळी टॅक्सी, रिक्षा रस्त्यावर उभी असल्यास ती प्रवाशांसाठी उपलब्ध आहे की नाही हे समजण्यासाठी या यंत्रेणेची मदत घेतली जाणार आहे.

रिक्षा-टॅक्सी उपलब्ध आहे का? हे आता 'या' यंत्रेणेवरून कळणार
SHARES

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल, वसई-विरार हद्दीत मोठय़ा संख्येने रिक्षा-टॅक्सी धावतात. परिवहन विभागाने परवाने खुले केल्यानंतर त्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरीही म्हणावी तशी सेवा अद्यापही प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळं काळी-पिवळी टॅक्सी, रिक्षा रस्त्यावर उभी असल्यास ती प्रवाशांसाठी उपलब्ध आहे की नाही हे समजण्यासाठी 'रूफलाइट इंडिकेटर'ची मदत घेतली जाणार आहे. 

रिक्षा-टॅक्सीमध्ये हे इंडिकेटर बसवण्यासंदर्भात गुरुवारी 'रूफलाइट इंडिकेटर' उत्पादकांसोबत परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. अनेक तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर ही सुविधा जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सेवेत आणण्याचं उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती मिळते.

असं काम करत इंडिकेटर

रिक्षा-टॅक्सी प्रवाशांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन विभागानं रूफलाइट इंडिकेटर बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रिक्षा-टॅक्सींच्या वरच्या बाजूला ३ रंगांतील इंडिकेटर बसविण्यात येणार आहेत. सेवा उपलब्ध असल्यास इंडिकेटरवर हिरवा रंग प्रकाशित केला जाणार आहे. पांढऱ्या रंगात इंडिकेटर प्रकाशित झाले तर सेवा बंद असल्याचं समजावं आणि रिक्षा-टॅक्सीत प्रवासी असल्यास लाल रंगात इंडिकेटर असणार आहे.

मागील ४ वर्षांपासून या सुविधेवर नुसतीच चर्चा होत असताना त्याला आता अंतिम स्वरूप दिलं जात आहे. नवीन काळ्या-पिवळ्या टॅक्सी व रिक्षा वाहनांना ही यंत्रणा त्वरित लागू केली जाणार असून, जुन्या टॅक्सींसाठी मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण आणि रिक्षांसाठी परिवहन आयुक्त निर्णय घेणार आहेत.

'रूफलाइट इंडिकेटर' बसवण्यासाठी प्रत्येकी १ हजार ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान खर्च चालकांना येणार आहे. इंडिकेटरची हाताळणी नेमकी कशी होणार, इंडिकेटरमध्ये बिघाड झाल्यास त्यांना येणारा खर्च, ते तात्काळ उपलब्ध करणं इत्यादी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं समजतं. दरम्यान, आता रिक्षा-टॅक्सी संघटनांशीही चर्चा केली जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा