भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा एप्रिल 2018 पासून

  Mumbai
  भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा एप्रिल 2018 पासून
  मुंबई  -  

  मुंबई ते मांडवा हा प्रवास केवळ 45 मिनिटांत पूर्ण करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. जलवाहतूक मजबूत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सागरी मंडळ (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) कडून हाती घेण्यात आलेल्या भाऊचा धक्का ते मांडवा रो रो प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. दोन महिन्यात या मार्गावरील बोटी चालवण्यासाठीच्या खासगी कंपन्यांच्या निविदा अंतिम करण्यात येतील. याअऩुषंगाने भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा एप्रिल 2018 मध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी संजय शर्मा यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

  भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवा प्रकल्प महाराष्ट्र सागरी मंडळासह सिडको आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्या माध्यमातून राबवला जात असून महाराष्ट्र सागरी मंडळाकडे नोडल एजन्सी म्हणून या प्रकल्पांची जबाबदारी आहे. त्यानुसार हा प्रकल्प शक्य तितक्या लवकर मार्गी लावत मुंबई ते मांडवा हा प्रवास सुकर आणि जलद करण्याच्या दृष्टीने भाऊचा धक्का ते मांडवा रो रो प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. ब्रेक वॉटरचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून मांडवा येथील जेट्टी टर्मिनलच्या कामालाही सुरुवात करण्यात आल्याचेही शर्मा यांनी सांगितले आहे. अंदाजे 130 कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे मुंबई ते मांडवा हे अंतर रोडने पार करण्यासाठी प्रवाशांना तासनतास वाया घालवावे लागतात. तिथे हे अंतर केवळ 45 मिनिटांत पूर्ण करता येणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या सेवेद्वारे प्रवाशांसह वाहनेही बोटीतून नेता येणार असल्याने ही सेवा प्रवाशांना आकर्षित करणारी ठरेल असे मानले जात आहे.

  सुरुवातीला या मार्गावर तीन ते चार बोटी चालवण्याचा विचार आहे. याला प्रतिसाद मिळाल्यास बोटींची संख्या वाढवण्यात येणार आहे. एका बोटीची प्रवाशी क्षमता किमान 150 प्रवाशी तर, 40 वाहने अशी असणार आहे. सुरुवातील तासाभराने एक बोट सुरू करण्यात येणार असून नंतर ही वेळ कमी-कमी करण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. बोटीचे व्यवस्थापन-देखभाल अर्थात बोटी चालवण्याचे काम खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून दीड-दोन महिन्यात कंत्राट देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या सेवेचे तिकीट प्रवाशांना परवडेल असेच ठेवण्याचा प्रयत्न मंडळाचा असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. त्यामुळे एप्रिल 2018 पासून मुंबई ते मांडवा हा प्रवास जलद, सुकर आणि स्वस्त होणार अशी आशा व्यक्त होत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.