इडली-चटणी बेतली असती जिवावर

  मुंबई  -  

  बहुतांश मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात इडली-चटणीच्या ब्रेकफास्टने होते. पण डोंबिवलीत रहाणाऱ्या एका रेल्वे प्रवाशासाठी हीच इडली-चटणी जीवघेणी ठरली असती. हातात इडली-चटणीचं पार्सल घेऊन धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा जीव थोडक्यात वाचला. हातातल्या चटणीमुळे या प्रवाशाचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामधल्या फटीमध्ये जाताजाता वाचला.

  दादर रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी ही घटना घडली. मूळचा डोंबिवलीचा असणारा 30 वर्षीय विनोद चंदनशिवे दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर तीनवर आलेली लोकल पकडण्यासाठी धावला. धावती ट्रेन त्याने पकडलीही. मात्र यावेळी त्याच्या हातात असलेली इडली-चटणीची पिशवी फाटली. चटणी हाताला लागल्यामुळे त्याचा हात निसटला आणि रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममधल्या फटीत ओढला गेला.

  एका क्षणात त्याच्या डोळ्यांसमोर साक्षात मृत्यू उभा ठाकला. आता आपला शेवट झाला अशी त्याची खात्री झाली. पण म्हणतात ना... त्याचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. कारण त्याच प्लॅटफॉर्मवर आरपीएफचे व्ही.एस. तायडे आणि मनोज प्रसाद हे दोन जवान गस्त घालत होते. त्यांनी विनोदला गाडीखाली ओढला जाताना पाहताच तात्काळ त्याला खेचून बाहेर काढलं. विनोदला कोणतीही मोठी दुखापत झाली नसून, केवळ मुका मार आणि थोडे खरचटले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.