Advertisement

रेल्वेतील सोयीसुविधांसाठी ४४ हजार कोटींचा प्रस्ताव


रेल्वेतील सोयीसुविधांसाठी ४४ हजार कोटींचा प्रस्ताव
SHARES

रेल्वेमंत्री पियुष गोयल पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान अनेक प्रस्ताव रेल्वेमंत्र्यासमोर ठेवण्यात येणार आहेत. त्यापैकीच एक एसी लोकल खरेदीचा प्रस्ताव, रेल्वेतील सोयीसुविधा आणि विकासासाठी ४४ हजार कोटींचा प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) रेल्वेमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वेकडून अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यासाठी मुंबईत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा शुक्रवारी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष अश्विनी लोहानी घेणार आहेत.


एमआरव्हीसीकडून रेल्वेमंत्र्यासमोर प्रस्ताव

देशातील पहिली एसी लोकल चर्चगेट ते विरार या मार्गावर सुरू करण्यात आली. पण अजूनही या एसी लोकलला प्रवाशांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. तसंच पश्चिम रेल्वेवर सध्या एसी लोकलच्या दिवसाला फक्त बारा फेऱ्या होतात. तर शनिवार आणि रविवारी ही लोकल धावतच नाही. आता या लोकलच्या फेऱ्या वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणखी लोकल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सोयीसुविधांचा पाढाच वाचणार

एसी लोकल खरेदीव्यतिरिक्त मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या आगामी मुंबई दौऱ्यावेळी रेल्वेतील सोयीसुविधा आणि विकासासाठी ४४ हजार कोटींचा प्रस्ताव रेल्वेमंत्र्यासमोर मांडण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे वेळापत्रकानुसार धावाव्यात, त्यासाठी सिग्नल यंत्रणेत सुधारणा, रेल्वे वॅगनची खरेदी, बोरिवली ते विरारदरम्यान पाचवा आणि सहावा ट्रॅक बांधणे, हार्बर मार्गाचा बोरिवली पर्यंत विस्तार, कल्याण-बदलापूर आणि कल्याण-आसनगाव या दोन्ही मार्गांवरील तिसऱ्या-चौथ्या ट्रॅकचे काम, पनवेल ते सीएसएमटी आणि पनवेल ते विरारदम्यान कॉरिडोर बांधणे अशा कामांसाठी हा ४४ हजार कोटींचा निधी वापरला जाणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा