Advertisement

युलू ई-बाइकला प्रवाशांचा अप्रतिम प्रतिसाद

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील युलू ई-बाइक धावत आहे.

युलू ई-बाइकला प्रवाशांचा अप्रतिम प्रतिसाद
SHARES

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील युलू ई-बाइक धावत आहे. वांद्रे (पूर्व) ते कुर्ला (पश्चिम) दरम्यानच्या प्रवासासाठी ई-बाइक वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सप्टेंबरपासून वांद्रे-कुर्ला संकुलात युलू ई-बाइकची सुरुवात झाली. या बाइकला मागील ३ महिन्यांत प्रतिसाद वाढला असून, मागील महिन्यात ७ नवीन स्थानकांची तसंच ई-बाइकची संख्या वाढविण्यात आली, तर ३ महिन्यांत ७ हजार ग्राहकांनी ई-बाइकचा वापर केला.

युलू ई-बाइक सुरुवातीला वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानक आणि वांद्रे-कुर्ला संकुलात एकूण १० ठिकाणी युलू ई-बाइक उपलब्ध होत्या. महिनाभरातच कलानगर जंक्शन इथंही युलू स्थानक सुरू करण्यात आलं. ई-बाइकचा वाढता प्रतिसाद पाहता गेल्या महिन्यात आणखी ७ ठिकाणी स्थानकं उभारण्यात आली आहेत.

सध्यस्थितीत युलू ई-बाइकची १८ स्थानकं असून, अद्याप कुर्ला (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर ही सुविधा उपलब्ध नाही. यासाठी युलूमार्फत महापालिकेला प्रस्ताव देण्यात आला असून, लवकरच तिथेही ही सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुविधा सुरू झाली तेव्हा केवळ ११० ई-बाइक उपलब्ध होत्या, त्यामध्ये प्रतिसादानुसार वाढ होत असून, या आठवड्याअखेरीस ही संख्या ४५० पर्यंत पोहोचेल.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील ३ महिन्यांत एकूण ७ हजार नवीन वापरकर्त्यांनी १ लाख ६२ हजार किमी अंतरासाठी युलू ई-बाइक वापरली. यामध्ये एकूण २७ हजार फेऱ्या झाल्या असून, इंधनाचा वापर कमी झाल्यानं १६ टन कार्बन उत्सर्जन कमी झाल्याचं समजतं. एमएमआरडीएच्या माध्यमातून शहर आणि महानगर परिसरात भविष्यात निर्माण होणाऱ्या ३३७ किमी मेट्रो जाळ्याच्या अनुषंगानं 'फर्स्ट आणि लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी' अनेक उपाय योजले जात आहेत. त्याच माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

नवीन ग्राहकांना युलूकडे आकर्षित करण्यासाठी विशेष सवलत योजनादेखील या महिन्यापासून देण्यात येत आहे. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर नवीन वापरकर्त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये युलूतर्फे देण्यात येणार आहेत. दिवसाला त्यापैकी केवळ ५० रुपये ग्राहकास खर्च करता येतील, तर एकूण वापरावर ३० टक्के सवलत (५० रुपयांपर्यंत) देण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement