Advertisement

बोगद्यांवरील झोपड्यांमुळे रेल्वेला धोका


बोगद्यांवरील झोपड्यांमुळे रेल्वेला धोका
SHARES

झोपड्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. झोपडपट्टीवासीयांचा पुनर्विकास देखील करण्यात आला आहे. पण अनेक ठिकाणी अजूनही बेघर मिळेल त्याजागी झोपडी बनवून आपले संसार थाटत आहेत. रेल्वेकडे झोपड्या रोखण्यासाठी कोणतीही ठोस यंत्रणा नसल्याने रेल्वेच्या हद्दीतील सुमारे 80 हेक्टर जागेवर 12 लाख झोपड्या पुन्हा उभ्या राहिल्या आहेत. पुढील पुनर्विकासात या झोपडीधारकांना पक्की घरे दिली जातील. मात्र त्यानंतर खरंच पुन्हा अशा झोपड्या उभ्या राहणार नाहीत? मध्य रेल्वेच्या ठाण्यापलीकडच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा बोगद्यांना आसपास आणि वर असलेल्या अनधिकृत बांधकामांमुळे धोका असल्याने या बोगद्यांवरील झोपड्या हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाला दिले आहेत.

मध्य रेल्वेच्या दिव्याच्या दिशेला बोगद्यावरील वन विभागाच्या जमिनीवरील झोपड्या हटवून तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी वन विभाग, राज्य सरकार काम करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र बोगद्याच्या कळवा आणि दिवा या दोन्ही बाजूंच्या आसपास अनेक झोपड्या आहेत. या झोपड्यांमधून सातत्याने रूळांवर कचरा टाकण्याचे प्रकार घडतात. तसेच कळव्याच्या दिशेला बोगद्यावर असलेल्या झोपड्या आणि शाळा यातील सांडपाणी थेट बोगद्यात पडत असल्याने या बोगद्यालाही धोका निर्माण झाल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. त्यासाठी नागपूर येथील सेंट्रल मायनिंग रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेकडून या बोगद्याच्या स्थितीविषयी अहवाल तयार करून कामही हाती घेण्यात आले होते. पण ते कागदी स्वरूपातच राहिले पुढे कोणतीही हालचाल करण्यात आली नाही.


गेल्या वर्षी पावसाळ्यात दिव्याच्या बाजूला पारसिक बोगद्यावर बांधलेली संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने त्यावेळी मोठी दूर्घटना घडली नसली, तरी बोगद्यावरील ही बांधकामे हटवण्याची निकड प्रशासनाच्या लक्षात आली. ठाणे महापालिकेने ही भिंत बांधण्यात पुढाकार घेतला असला, तरी आठ महिने उलटूनही या भिंतीची एकही वीट अद्याप रचलेली नाही. तसेच या भिंतीपलीकडील झोपड्या वन विभागाच्या हद्दीत असल्याने या झोपड्यांवरही अजून कोणतीही कारवाई झाली नाही. जर कारवाई झाली तर येत्या पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या लाखो प्रवाशांच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार दूर होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पारसिक बोगद्यामधून लोकल ट्रेन जाताना अंगावर भीतीने काटा येतो. कधी काय होईल याची शाश्वती नाही. कधी अंगावर कचरा पडेल,कधी लहान मुलं दगड मारतील,कधी संडासचं पाणी अंगावर पडेल याची शाश्वती नाही. गेल्याच वर्षी भिंत कोसळून मोठा रेल्वे अपघात घडणार होता. पण देवाच्या तो कृपेने टळला होता. जर वनविभागाने वेळीच कारवाई केली असती, तर आज ही वेळ आली नसती. थोडक्यात काय, रोज मरे त्याला कोण रडे.

निलेश देशमुख, सदस्य, कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा