Advertisement

मरीन ड्राईव्हला स्वतंत्र सायकल ट्रॅक सुरु!

एअर इंडिया मुख्यालय (मरीन ड्राईव्ह) ते वरळी सी फेस या ११.५ किलोमीटरच्या मार्गिकेवर महापालिकेडून खास सायकल ट्रॅक बनवण्यात आला आहे. हा सायकल ट्रॅक मुंबईकरांना सध्या फक्त रविवारी वापरता येणार आहे.

मरीन ड्राईव्हला स्वतंत्र सायकल ट्रॅक सुरु!
SHARES

मुंबईकरांसाठी धकाधकीचं जीवन काही नवीन नाही. अशा धावपळीच्या आयुष्यात स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणं साहजिक आहे. दुर्लक्ष काय, स्वत:चं आरोग्यही आहे, हे मुंबईकर पार विसरूनच गेले आहेत! त्यामुळेच, मुंबईकरांमध्ये आरोग्यासाठी सायकलिंगबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी महापालिकेकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

एअर इंडिया मुख्यालय (मरीन ड्राईव्ह) ते वरळी सी फेस या ११.५ किलोमीटरच्या मार्गिकेवर महापालिकेडून खास सायकल ट्रॅक बनवण्यात आला आहे. हा सायकल ट्रॅक मुंबईकरांना सध्या फक्त रविवारी वापरता येणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त अजोय मेहता, पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी या सायकल ट्रॅकचा शुभारंभ करण्यात आला.

मुंबईकर नागरिकांच्‍या धकाधकीच्या जीवनात शारिरीक तंदुरुस्ती‍साठी व प्रदुषणमुक्त मुंबईसाठी हा सायकल ट्रॅक अत्यंत उपयुक्त ठरेल.

विश्वनाथ महाडेश्वर, महापौर


१० डिसेंबरपासून होणार सुरु

पुढच्या रविवारी, अर्थात १० डिसेंबरपासून हा सायकल ट्रॅक मुंबईकरांच्या वापरासाठी पूर्ण स्वरूपात खुला होईल. उद्घाटनानंतर पहिल्या ५ किलोमीटरच्या टप्प्यावरच सायकलींना परवानगी देण्यात आली होती.



भाड्यानेही मिळणार सायकल

दरम्यान, स्वत:ची सायकल असणाऱ्या मुंबईकरांना मोफत या ट्रॅकचा वापर करता येणार आहे. शिवाय, ज्या मुंबईकरांकडे स्वत:ची सायकल नाही, अशांसाठी १०० रूपये तासाप्रमाणे सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


प्रतिसाद चांगला मिळाल्यास सायकल ट्रॅक नियमित

उद्घाटनावेळीच मुंबईकरांचा या सायकल ट्रॅकला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, मुंबईकरांचा असाच चांगला प्रतिसाद मिळाला, तर हा सायकल ट्रॅक फक्त रविवारसाठी नसून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी बोलताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले.

इथल्या सायकल ट्रॅकला मिळालेला प्रतिसाद पहाता लवकरच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही सायकल ट्रॅक सुरु करू. तसेच, यामध्ये आणखीन काही सुधारणा करता येईल का? याचाही विचार करू.

अजोय मेहता, महापालिका आयुक्त


'सायकलिंग ही लोकचळवळ व्हावी'

दरम्यान, सायकल ट्रॅकला पोलिसांचे सहकार्य यापुढेही असेच मिळेल असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच, सायकल चालवणे ही मुंबईकरांची एक लोकचळवळ व्हावी असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.



हेही वाचा

ट्रॅफिकवर भारी सायकल स्वारी!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा