Advertisement

'शिवशाही' धावणार रत्नागिरी मार्गावर


'शिवशाही' धावणार रत्नागिरी मार्गावर
SHARES

'एसटी महामंडळा'ची अत्याधुनिक सुविधांनी सज्ज, वातानुकूलित 'शिवशाही' बस कोकणवासीयांच्या सेवेत दाखल होत असून शनिवार 10 जूनपासून ही बस मुंबई ते रत्नागिरी मार्गावर धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर अत्याधुनिक सोयींनी युक्त 'तेजस एक्स्प्रेस' आणल्यानंतर एसटीनेही प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी 'शिवशाही' सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबई ते रत्नागिरी 'शिवशाही' प्रवासासाठी प्रवाशांना 556 रुपये मोजावे लागणार आहेत.

'शिवशाही' बसमध्ये एकूण 45 पूश बॅक आसने असून ही बस वातानुकूलित आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी प्रत्येक सीटला एलसीडी स्क्रीन बसविण्यात आले आहेत. सोबतच हेडफोन्सनी एफएम ऐकण्याची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. ही अत्याधुनिक बस म्हणजे एस. टी. च्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे.

'शिवशाही' बस लवकरच राज्यातील विविध मार्गांवर सुरु करण्याची महामंडळाची तयारी आहे. या अत्याधुनिक बसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी आशा यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी व्यक्त केली.

'हिरकणी' म्हणजेच 'निम आराम' प्रकारातील बसच्या तिकीटाच्या जवळपास जाणारेच 'शिवशाही' बसचे तिकीट असल्याने प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार नाही. त्यांना माफक दरांत वातानुकूलित बसने प्रवास करता येईल, असेही देओल यांनी सांगितले.

'शिवशाही'चे (मुंबई ते रत्नागिरी) तिकीट दर व इतर माहिती :

मुंबई सेंट्रल ते रत्नागिरी (मार्गे दादर, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, रामवाडी, माणगांव, महाड, भरणा, नाकाम, चिपळूण, संगमेश्वर)

वेळ :
मुंबईहून रात्री 9:45 वाजता, रत्नागिरीला पोहोचण्याची वेळ : सकाळी 7
रत्नागिरीहून रात्री 10 वाजता, मुंबईला पोहोचण्याची वेळ : सकाळी 7 वाजता

तिकीट दर
मुंबई ते रत्नागिरी : रु. 556
मुंबई ते संगमेश्वर : रु. 483
मुंबई ते चिपळूण : रु. 420

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा