Advertisement

ऐन उन्हाळ्यात बेस्टच्या एसी बसेस बंद


ऐन उन्हाळ्यात बेस्टच्या एसी बसेस बंद
SHARES

तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी महापालिकेने काटकसरीचा आराखडा सादर करत वातानुकूलित बसेस बंद करण्याची सूचना केली. याची तात्काळ अंमलबजावणी बेस्ट उपक्रमाने केली असून, येत्या 17 एप्रिलपासून सर्व वातानुकूलित बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टच्या बस तिकीटात वाढ करण्यासाठी तसेच काटकसरीबाबत महापालिका प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार बेस्ट उपक्रमाने आपला काटकसरीचा अहवाल बेस्ट समितीपुढे सादर केला आहे. या प्रस्तावावर बेस्ट समितीचा निर्णय झालेला नसतानाच गुरुवारी बेस्ट उपक्रमाने चालविण्यात येणाऱ्या सर्व वातानुकूलित बसमार्गाचे प्रवर्तन सोमवारी 17 एप्रिल 2017 पासून खंडित करण्यात येत असल्याचे बेस्टने जाहीर केले.

बेस्टच्यावतीने 25 बस मार्गावर 266 वातानुकूलित बसेस धावत असून, या वातानुकूलित बसेसमध्ये दरदिवशी 18 ते 20 हजार प्रवाशी प्रवास करत आहेत. वातानुकूलित बसपासधारक प्रवासी साध्या तसेच मर्यादित बसगाड्यांमधून प्रवास करू शकतील. जर त्यांना मर्यादित बसेसमधून प्रवास करायचा नसल्यास आपल्या बसपासाच्या उर्वरीत रक्कम उपक्रमाकडून प्राप्त करू शकतील,असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी हनुमंत गोफणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

बेस्ट आथिर्क तोट्यात आल्यामुळे महापालिकेच्यावतीने मदत करण्याची मागणी सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. याबाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक घेऊन बेस्टला आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे. परंतु ही आर्थिक मदत करण्यापूर्वी महापालिकेने काटकसरीचा आराखडा तयार करून बेस्ट समितीत हा अहवाल मंजूर करून द्यावा, त्यानंतरच महापालिकेच्यावतीने मदत केली जाईल असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या सोमवारी बेस्ट समितीत उपक्रमाने सादर केलेल्या काटकसरीच्या अहवालावर निर्णय होण्याची शक्यता आहे. परंतु बेस्ट समितीच्या मान्यतेपूर्वी उपक्रमाने वातानुकूलित बसेस बंद केल्यामुळे एकप्रकारे समितीलाच उपक्रमाने दुर्लक्षित केल्याचे बोलले जात आहे.

वातानुकूलित बसमार्ग - 25
वातानुकूलित बसेसची संख्या - 266
वातानुकूलित बसपासधारकांची संख्या - 216
प्रतिदिन प्रवाशांची संख्या - 18 ते 20 हजार

वातानुकूलित बसेस बंद करायला उशीरच झाला - रवी राजा
बेस्टच्या वातानुकूलित बसेस या खरे तर चार वर्षापूर्वीच बंद व्हायला हवे. जर या बसेस बंद केल्या असत्या तर चार वर्षांपूर्वी होणारे बेस्ट उपक्रमाचे नुकसान टाळता येणार आहे. वातानुकूलित बसेस बंद कराव्यात ही आपली मागणी पहिल्यापासूनच होती. कारण एका बसमागे ८० टक्के नुकसान प्रशासनाला सोसावे लागते. एकप्रकारे हा पांढराच हत्ती असल्याचे विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी स्पष्ट केले. या बसेस बंद केल्या जात नसल्यामुळे बुधवारी झालेल्या गटनेत्यांच्या सभेतही आपण प्रशासनाला जाब विचारला होता. त्यामुळे गुरुवारी झालेल्या महापलिका प्रशासन व बेस्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर या बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे विरोधी पक्षनेते रवि राजा यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा