रेल्वेवर येणारे ताण पाहता ऑफिसच्या वेळा बदलणार !

  Mumbai
  रेल्वेवर येणारे ताण पाहता ऑफिसच्या वेळा बदलणार !
  मुंबई  -  

  दिवसेंदिवस रेल्वे प्रवासी संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे ऑफिसच्या वेळेवर लोकलचे वेळापत्रक खोळंबते, तर अनेकवेळा लोकलवर ताण येत असतो. गर्दीवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऑफिसच्या वेळा बदलण्याची सूचना राज्य सरकारला यापूर्वीच दिली आहे. सकाळी 7 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे ऑफिसच्या वेळा बदलणे आवश्यक असून यासंदर्भात राइट्स या रेल्वेच्या संस्थेकडून अहवाल देखील तयार करण्यात येत आहे. राज्य सरकारबरोबरही याबाबत चर्चा सुरू असून कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत आग्रही असल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

  मुंबईतील ऑफिसच्या वेळा ठरलेल्या असल्याने सकाळी दक्षिण मुंबईकडे येण्यासाठी आणि संध्याकाळी परत जाण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे एकीकडे प्रवाशांना गर्दीचा सामना तर करावा लागतोच शिवाय अपघात देखील होत आहे. डोंबिवलीतील भावेश नकाते याच्या अपघाती मृत्यूनंतर मुंबई उच्च न्यायालयाने लोकलची गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळेतील बदलांसह अन्य पर्याय निवडावा असे रेल्वे प्रशासनास सूचवले होते.

  त्यानुसार, राइट्स (रेल इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिस) तर्फे अभ्यास केला जात असून पुढील आठवड्यात त्यातील निष्कर्ष सादर केले जाणार आहेत. कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत रेल्वेमंत्र्यांनी आग्रही भूमिका घेत राज्य सरकारलाही कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत सुचवले होते. राज्य सरकारने देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद देत एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळा बदलल्यास लोकलच्या गर्दीचा प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.