Advertisement

ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार


ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार
SHARES

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणण्यासाठी 190 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचा आराखडा याआधीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार केला आहे. त्यानुसार मुंबईत एक मेट्रो मार्ग केव्हाच कार्यान्वित झाला असून सध्या आणखी तीन मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र त्याचवेळी मुंबई महानगर प्रदेशातील जनतेला, त्यातही ठाणेकरांना मेट्रोची प्रतीक्षाच करावी लागत आहे. आता मात्र त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. कारण गुरुवारी 11 मे रोजी या मार्गाच्या निविदा खुल्या करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त युपीएस मदान यांनी दिली आहे. याच दिवशी डीएन नगर ते मंडाले या मेट्रो-2 ब च्या निविदाही खुल्या करण्यात येणार आहेत. त्यानुसार निविदा खुल्या केल्यानंतर शक्य तितक्या लवकर कंत्राट देत या दोन्ही मेट्रो मार्गाच्या कामाला डिसेंबर 2017 मध्ये सुरूवात करण्यात येणार असल्याचेही मदान यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले.

मेट्रो-4 आणि मेट्रो-2ब साठी जानेवारी 2017 मध्ये एमएमआरडीएने निविदा मागवल्या होत्या. वडाळा-कासारवडवली या मेट्रोमार्गामुळे मुंबई आणि ठाणे शहर मेट्रोने जोडले जाणार असून 32 किमीचे हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मेट्रो-4 चा वडाळा ते जीपीओ असा विस्तारही भविष्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यावरून थेट सीएसटीला मेट्रोने काही मिनिटांत आणि तेही गारेगार प्रवास करत पोहचता येणार आहे. म्हणूनच ठाणेकरांच्या दृष्टीने मेट्रो-4 हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे डीएन नगर ते मंडाले हे अंतरही कमी करण्यासाठी मेट्रो-2 ब च्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. 23.5 किमी अंतराचा हा मार्ग वांद्रे, बीकेसीतून जाणार आहे. त्यामुळे हा मार्गही मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गांचे भूमिपूजन याआधीच 24 डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे.

असा आहे प्रकल्प:

वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो-4

  • 32.3 किमी लांबी
  • 14,549 कोटी खर्च
  • 32 मेट्रो स्थानके
  • 5 पॅकेजमध्ये होणार काम
  • वडाळा ते अमर महल जंक्शन
  • गरुडियानगर ते सूर्यानगर
  • गांधीनगर ते सोनापूर
  • मुलुंड फायर स्टेशन ते माजीवडा
  • कापूरबावडी ते कासारवडवली

डीएन नगर-वांद्रे-मंडाले मेट्रो-2 ब

  • 23.5 किमी लांबी
  • 10,986 कोटी खर्च
  • 22 मेट्रो स्थानके
  • इसिकनगर ते खिरानगर
  • सारस्वत नगर ते आयएलएफएस, बीकेसी
  • एमटीएनएल ते चेंबूर
  • डायमंड गार्डन टू मंडाले
  • कुर्ला सेंट्रल रेल्वे क्राॅसिंग
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा