Advertisement

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास परवानगी; स्थनाकात गर्दी वाढण्याची शक्यता


सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास परवानगी; स्थनाकात गर्दी वाढण्याची शक्यता
SHARES

राज्य सरकारनं सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासास परवानगी दिली आहे. या परवानगीमुळं रेल्वे स्थानकावर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेता गरजेनुसार २, ३ किंवा जास्त प्रवेशद्वार, पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर मनुष्यबळ तैनात असणार आहे. प्रवेशद्वारासह प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

राज्य सरकारनं सर्वसामांन्यांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर रेल्वे स्थानकांतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा बलातील (आरपीएफ) अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या व्यूहरचना आखली आहे. प्रत्येक स्थानकातील एकापेक्षा जास्त प्रवेशद्वार, पादचारी पूल प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार असून प्रतिबंधित वेळेत प्रवाशांच्या तपासणीसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची तजवीज करण्यात आली आहे.

सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या १० तासांत परवानगी नसलेल्या सर्वसामान्य प्रवाशांची स्थानकाच्या आवारात गर्दी होऊ शकते. ही बाब विचारात घेऊन या वेळेत स्थानकाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे प्रवेश ओळखपत्र, परवानगी पत्र तपासले जाणार आहे.

त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्भय पथके, विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. स्थानक आवारातील सीसीटीव्ही कॅ मेरांद्वारे प्रवाशांच्या गर्दीवर करडी नजर ठेवली जाणार आहे. स्थानकाच्या प्रत्येक भागत जीआरपी, आरपीएफ, गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत.

जीआरपी मुंबई आयुक्तालयातील सुमारे ३१०० अधिकारी, अंमलदार १ फेब्रुवारीपासून गर्दीचे नियंत्रण, झाडाझडती, तपासणीसाठी तैनात असतील. याशिवाय गृहरक्षक दलाच्या सुमारे दोन हजार जवानांची कुमक या कामी रेल्वे पोलिसांना मिळेल. गरज भासल्यास महाराष्ट्र सुरक्षा मंडळातील जवान उपलब्ध होतील, यासाठी रेल्वे पोलीस प्रयत्न करत आहेत.

उपनगरीय स्थानकात १ हजार आरपीएफ जवान आहेत. त्यांच्या कामांच्या वेळांचेही नियोजन केले आहे. स्थानकातील गर्दीच्या नियंत्रणासाठी २ ड्रोन कॅमेरे खरेदी केले जाणार आहेत.

रंगीत तालीम

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू झाल्यावर गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी लावलेल्या बंदोबस्ताची रेल्वे पोलिसांकडून रंगीत तालीम(मॉक ड्रिल) घेतली जाणार आहे. त्यात प्रवेशद्वारांतून प्रवासी सहज, सुलभरीत्या स्थानकांवर कसे पोहोचतील, अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी उसळली तर किंवा प्रवेशद्वारावर खोळंबलेले प्रवासी हिंसक बनल्यास काय उपाय योजावा, याचा अभ्यास केला जाईल.

सध्या  महत्वाच्या व गर्दीच्या स्थानकात १०० ते १२५ आरपीएफ व लोहमार्ग पोलीस होते. गर्दी नियंत्रणासाठी त्यांची संख्या २०० पर्यंत करण्यात येईल. बंद असलेले काही प्रवेशद्वार, पादचारी पूलही सुरु के ले जाणार आहेत. आरपीएफचे मनुष्यबळ वाढून १५०० पर्यंत नेण्यात येईल.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा