Advertisement

दिवेघाटाची वाट सुखकर होणार

रस्ता चौपदरीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू

दिवेघाटाची वाट सुखकर होणार
SHARES

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून हडपसर ते दिवेघाट या रखडलेल्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या निविदेची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या १० वर्षांत हडपसर ते सासवड रस्ता मार्गावर तुकाईदर्शन ते दिवेघाटदरम्यान शेकडो अपघात झाले. रोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरील प्रवाशांच्या मनस्तापात वाढ झाली आहे. अखेर चौपदरीकरणाला मुहूर्त मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दहा वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी मार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. त्यानुसार, सासवड ते पंढरपूर मार्गावर काम सुरू करण्यात आले. मात्र हडपसर ते दिवेघाट मार्गातील भूसंपादनामुळे रस्त्याचे काम रखडले. अखेर भूसंपादनाचे कामही पूर्ण झाले आहे. गेल्या दहा वर्षात या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होऊन दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला आणि शेकडो जण जखमी झाले.

रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि अतिक्रमणांमुळे दररोज प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर अखेर प्राधिकरणाकडून दिवेघाट ते हडपसर (१३.२५ किलोमीटर) रस्त्याच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. वरिष्ठ कार्यालयाच्या मंजुरीनंतर या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणासाठी अडथळा ठरणारी अतिक्रमणे नागरिकांनी स्वतःहून काढावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

  • हडपसर ते दिवेघाटापर्यंतच्या चौपदरीकरणामधील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.
  • सर्व्हिस रोडची निर्मिती काँक्रिटमध्ये करण्यात येणार आहे.
  • फुरसुंगीमध्ये रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या मार्गात वडकी पालखी तळाजवळ, वडकीच्या प्रवेशद्वाराजवळ; तसेच उरुळी देवाचीच्या प्रवेशद्वाराजवळ भुयारी मार्ग असणार आहे.
  • तुकाईदर्शन येथील 'एसपी इन्फोसिटी'समोर उड्डाणपूल प्रस्तावित आहे.

'उड्डाणपूल, भुयारी मार्ग प्रस्तावित'

'हडपसर ते दिवेघाटापर्यंतच्या चौपदरीकरणाच्या निविदेचे काम सुरू झाले आहे. रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून, सर्व्हिस रोड काँक्रिटचा असणार आहे. 'एसपी इन्फोसिटी'समोर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. या भागातील दोन्हीकडील अतिक्रमण नागरिकांनी स्वतःहून काढल्यास काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल,' अशी माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय जोशी यांनी दिली.



हेही वाचा

टाटा पॉवर कंपनीचा वीज दरात वाढ करण्याचा प्रस्ताव

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पनवेलसाठी ठरतोय गेम चेंजर

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा