Advertisement

कोकणात येणार 21 नवी रेल्वे स्थानके!


कोकणात येणार 21 नवी रेल्वे स्थानके!
SHARES

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. सुट्ट्या किंवा सणासुदीच्या काळात तर त्यात आणखीनच वाढ होते. यावेळी प्रवाशांना रेल्वेतील गर्दीसोबतच आणखीन एक त्रास सहन करावा लागतो; तो म्हणजे मुख्य रेल्वे स्थानकावर उतरून आपल्या गावी पोहोचण्याचा. कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांची संख्या मर्यादित असल्याने प्रवाशांना ही समस्या प्रामुख्याने सतावते. मात्र लवकरच प्रवाशांची ही समस्या काही प्रमाणात दूर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर येत्या काळात 21 नवीन स्थानके उभारण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्तावही रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे.

या 21 स्थानकांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांची संख्या वाढून 87 होणार आहे. कोकण रेल्वेला वेगवान बनवण्यासोबतच रेल्वेची सेवा अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठीच ही नवीन स्थानके उभारण्यात येणार आहेत. नव्या स्थानकांमुळे दोन रेल्वे स्थानकांमधील अंतर 12.75 किमीवरुन 8.3 किमीवर येणार आहे.

कोकण रेल्वेच्या विस्तारीकरणात रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण हा महत्वाचा भाग आहे. एकूण 147 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. साधारणपणे 1 हजार 110 कोटी रुपयांचा खर्च या कामासाठी अपेक्षित आहे.

नवीन रेल्वे स्थानकांचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालय, तसेच संबंधित विभागांकडे पाठवण्यात आला आहे. याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच पुढील काम सुरु होईल.
- एल. के. वर्मा, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा